पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल

पुणे, 13 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांसह इतर 5 जणांच्या विरोधात पुण्यातील पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. स्थानिक शेतकऱ्याच्या तक्रारीवरून त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात हा एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पूजा खेडकर यांच्या आईने आपल्याला धमकावल्याचा आरोप या शेतकऱ्याने केला आहे. त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या पूजा खेडकर यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

https://x.com/ANI/status/1811952546417619090?s=19

शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल

पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावल्याचा आरोप या शेतकऱ्याने केला आहे. याप्रकरणी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर आणि वडील दिलीप खेडकर यांच्यासह 5 जणांच्या विरोधात कलम 323, 504, 506 अंतर्गत एफआयआर नोंदविण्यात आला आहे. तसेच मनोरमा खेडकर यांच्या विरोधात शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती पौड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोज यादव यांनी दिली. तत्पूर्वी, सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत मनोरमा खेडकर या पिस्तूल घेऊन शेतकऱ्यांना धमकावताना दिसत आहे. वास्तविक, पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी पुण्यातील मुळशी तालुक्यातील एका गावात जमीन खरेदी केली होती. त्याठिकाणी हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. सध्या या प्रकरणाचा पोलीस तपास करीत आहेत.

कोण आहेत पूजा खेडकर?

दरम्यान, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी असलेल्या पूजा खेडकर यांची काही दिवसांपूर्वीच पुण्यातून वाशिम येथे बदली करण्यात आली होती. सत्तेचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून पूजा खेडकर यांची राज्य सरकारने बदली केली होती. याप्रकरणी पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी मुख्य सचिवांना पत्र लिहून पूजा खेडकर यांची तक्रार केली होती. याशिवाय, पूजा खेडकर या व्हीआयपी नंबर प्लेट असलेल्या त्यांच्या वैयक्तिक ऑडी कारवर लाल-निळे दिवे लावल्यामुळे चर्चेत आल्या होत्या. तसेच त्यांनी या कारवर महाराष्ट्र शासन असे देखील लिहिले होते. सोबतच पूजा खेडकर यांच्यावर यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी बनावट अपंगत्व आणि नॉनक्रिमी लेयर प्रमाणपत्रे सादर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *