पुणे, 06 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) पोलीस कर्मचाऱ्याच्या कानाखाली मारल्याप्रकरणी भाजप आमदार सुनील कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार सुनील कांबळे यांनी पुण्यातील ससून रुग्णालयातील एका कार्यक्रमादरम्यान एका पोलिसाला कानाखाली मारली होती. हा संपूर्ण प्रकार घडला तेव्हा या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. या घटनेमुळे सध्या आमदार सुनील कांबळे यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
https://twitter.com/ANI/status/1743264293590876237?s=19
पुण्यातील ससून रुग्णालयात काल विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, पुणे कॅन्टोन्मेंटचे आमदार सुनील कांबळे यांच्यासह विविध नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सुनील कांबळे हे व्यासपीठावरून रागाच्या भरात खाली आले. त्यावेळी तेथे उभ्या असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला सुनील कांबळे हे काहीतरी म्हणाले. त्यानंतर त्यांनी या पोलीस कर्मचाऱ्याच्या कानाखाली लगावली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर अनेकांनी टीका केली आहे.
मारलं नाही फक्त धक्का दिला!
याप्रकरणी पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे सुनील कांबळे यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे. दरम्यान, यासंदर्भात सुनील कांबळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी त्याला मारलं नाही तर मी त्याला फक्त धक्का दिला, असे सुनील कांबळे म्हणाले आहेत. तसेच मारहाण करायला तो काही माझ्या ओळखीचा नाही किंवा माझा त्याच्यासोबत वाद पण नाही. त्यामुळे मी त्याला का मारहाण करू? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.