टीम इंडियाला झटका! मोहम्मद शमी कसोटी मालिकेतून बाहेर

नवी दिल्ली, 16 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. तसेच अष्टपैलू क्रिकेटपटू दीपक चहरने देखील कौटुंबिक कारणावरून दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघार घेतली आहे. याची माहिती बीसीसीआयने एक निवेदन प्रसिद्ध करून दिली आहे.

https://twitter.com/BCCI/status/1735881549206413430?s=19

काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघाची घोषणा केली होती. तेव्हा त्यांनी मोहम्मद शमीचा कसोटी मालिकेतील सहभाग त्याच्या फिटनेसवर अवलंबून असेल, असे म्हटले होते. मात्र, मोहम्मद शमी वेळेत तंदुरुस्त होऊ न शकल्याने तो या कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याला या मालिकेत खेळण्यास बीसीसीआय वैद्यकीय संघाने मंजुरी दिली नाही. त्यामुळे मोहम्मद शमी आता दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेमधून बाहेर पडला.



याशिवाय, दीपक चहरने देखील कौटुंबिक कारणावरून एकदिवसीय मालिकेतून माघार घेतली आहे. आपण कौटुंबिक वैद्यकीय कारणामुळे दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेसाठी उपलब्ध होणार नसल्याचे दीपक चहर याने बीसीसीआयला कळवले आहे. त्यामुळे आफ्रिका विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी त्याच्या जागी वेगवान गोलंदाज आकाश दीप याची निवड केली आहे. तसेच 17 डिसेंबर रोजी होणाऱ्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर श्रेयस अय्यर देखील दुसऱ्या आणि तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी उपलब्ध नसणार आहे. श्रेयस अय्यर थेट कसोटी संघात सामील होणार आहे. याची माहिती बीसीसीआयने दिली आहे.

तत्पूर्वी, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 सामन्यांची टी-20 मालिका बरोबरीत सुटली आहे. त्यानंतर आता भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 17 डिसेंबर पासून 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका होईल. या मालिकेनंतर भारतीय संघ आफ्रिका विरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळणार आहे. यातील पहिला सामना 26 डिसेंबरपासून सुरू होईल.

 

 

भारताचा सुधारित एकदिवसीय संघ:-

ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार आणि विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि आकाश दीप.

One Comment on “टीम इंडियाला झटका! मोहम्मद शमी कसोटी मालिकेतून बाहेर”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *