नवी दिल्ली, 25 मेः कोविड काळानंतर बांधकाम क्षेत्राच्या विकास कामांना ब्रेक लागला होता. यामुळे स्टील आणि सिमेंटच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. या वाढत्या किमतीमुळे बांधकाम व्यावसायिक मोठ्या अडचणीत सापडले होते. मात्र आता स्टील उत्पादनांच्या दरवाढीत घसरणाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केंद्र सरकारने विविध स्टील उत्पादनांवरील विविध करांना कात्री लावण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे.
देशांतर्गत स्टील उत्पादनांच्या किमतीत सुमारे10 ते 15 टक्क्यांनी घसरण होण्याची शक्यता उद्योग क्षेत्रातील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. स्टील उत्पादनांवर निर्यात शुल्काच्या आकारणीमुळे भाव घसरणीला चालना मिळणार आहे. तसेच दुय्यम स्टील उत्पादनांचे भाव 15 टक्क्यांनी घसरणार असल्याचा अंदाज इंजिनिअरिंग एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलचे चेअरमन महेश देसाई यांनी व्यक्त केला आहे.
बांधकाम क्षेत्रातील कंपन्यांचे नेतृत्व करणाऱ्या क्रेडाईने (सीआरईडीएआय) सरकारच्या प्रयत्नांना दाद दिली आहे. स्टी उत्पादनाच्या किंमतीत घसरण झाल्यास त्याचा थेट लाभ हा सर्वसामान्य ग्राहकांना होणार आहे. स्टील उत्पादनांच्या किंमती घटल्यास बांधकाम व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.