सर्वसामान्यांना मोठा झटका! एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ

नवी दिल्ली, 01 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) सरकारी तेल कंपन्यांनी मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्य जनतेला मोठा झटका दिला आहे. तेल कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ केली आहे. त्यानुसार, 19 किलो वजनाचे व्यावसायिक गॅस सिलिंडर आता 25.50 रुपयांनी महागले आहे. ही दरवाढ आजपासून लागू होणार आहे. त्यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट मधील जेवण महागण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होणार आहे. तर दुसरीकडे घरगुती गॅसच्या किंमतीत कसलाही बदल झालेला नाही.

पाहा नवे दर काय आहेत?

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत आजपासून 25.50 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे दिल्लीत सध्या व्यावसायिक गॅस सिलिंडर आता 1795 रुपयांना मिळत आहे. तर मुंबईमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरचा दर सध्या 1749 रुपये, चेन्नई 1960 रुपये आणि कोलकाता येथे 1911 रुपये इतका झाला आहे.

घरगुती गॅसच्या किंमती स्थिर!

तत्पूर्वी, केंद्र सरकारने 14.2 किलोच्या घरगुती गॅसच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे देशातील सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईमध्ये सध्या घरगुती गॅस सिलिंडर 902.50 रुपयांना मिळत आहे. दरम्यान, 30 ऑगस्टपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. त्यावेळी केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडर 200 रुपयांनी स्वस्त केला होता. तेंव्हापासून घरगुती गॅसच्या किंमती स्थिर आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *