अकोला, 27 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज मोठी घोषणा केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांची युती तुटली असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यात युती संदर्भात अनेकदा चर्चा झाल्या. मात्र, या चर्चा आता निष्फळ ठरल्या आहेत. तर या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र लढणार असल्यामुळे याचा फटका महाविकास आघाडीच्या उमेदवारांना बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या राज्य समितीने नागपुरातील काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितले आहे. ते अकोल्यात पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
https://twitter.com/VBAforIndia/status/1772864208431931423?s=19
https://twitter.com/eprabuddhbharat/status/1772697563164029047?s=19
जरांगे पटलांसोबत आघाडीबाबत चर्चा
या चर्चांमध्ये महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला 4 जागा दिल्या असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले होते. मात्र, महाविकास आघाडीची ही ऑफर वंचित बहुजन आघाडीला मान्य नव्हती. तसेच महाविकास आघाडीचे नेते देखील वंचित बहुजन आघाडीला जास्त जागा सोडण्यास तयार नव्हते. त्यामुळे आज अखेर वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत एकटे लढण्याचा निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी, प्रकाश आंबेडकर यांनी काल मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी जरांगे पाटलांना आघाडीचा प्रस्ताव दिला. तर मनोज जरांगे पाटील हे प्रकाश आंबेडकर यांच्या आघाडीच्या प्रस्तावावर सकारात्मक असून, येत्या 30 तारखेला ते त्यांचा अंतिम निर्णय जाहीर करणार आहेत. त्यामुळे राज्यात नवी आघाडी स्थापन होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
वंचित बहुजन आघाडीची पहिली यादी जाहीर
दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी आज लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या 8 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. त्यानुसार, येत्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर हे स्वतः अकोला मतदार संघातून निवडणूक लढविणार आहेत. तसेच भंडारा – गोंदिया मधून संजय गजानंद केवट, गडचिरोली – चिमूर येथून हितेश पांडुरंग मडावी, चंद्रपुरातून राजेश वारलुजी बेले, बुलढाणा मधून वसंत राजाराम मगर, अमरावतीतून कुमारी पर्जक्ता तारकेश्वर पिल्लेवान, वर्धा मधून राजेंद्र साळुंके आणि यवतमाळ – वाशीम मधून सुभाष खेमसिंग पवार अशी या उमेदवारांची यादी आहे. तर वंचित बहुजन आघाडीची ही पहिली यादी असून, बाकी जागांची अंतिम यादी 2 एप्रिलपर्यंत जाहीर होईल, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.