मुंबई, 06 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेचा अर्ज घेण्यासाठी प्रक्रिया 30 सप्टेंबर 2024 पर्यंत चालू ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. या योजनेत अडीच कोटी महिला लाभार्थींना लाभ देण्याचे राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे महिलांना लाडकी बहीण योजनेसाठी या महिना अखेरपर्यंत अर्ज करता येणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आजपर्यंत जुलै आणि ऑगस्ट अशा दोन टप्प्यात राज्यातील 1 कोटी 59 लाख पात्र महिलांना 4 हजार 787 कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली आहे.
https://x.com/CMOMaharashtra/status/1831702976634761484?s=19
या महिलांना एकत्रित 4500 रुपये देणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशी एकत्रित 3 हजार रुपयांची रक्कम डीबीटी द्धारे थेट खात्यात जमा करण्यात आली आहे. तर ज्या महिलांनी या योजनेसाठी सप्टेंबर महिन्यात अर्ज दाखल केला असेल त्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तिन्ही महिन्यांचे एकूण 4 हजार 500 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होतील, असेही राज्य सरकारने सांगितले आहे.
https://x.com/CMOMaharashtra/status/1831677500566516185?s=19
अन्य कोणत्याही योजना बंद होणार नाही
लाडकी बहिण योजनेमुळे अन्य कोणत्याही योजना बंद होणार नाहीत, असे स्पष्टीकरण राज्य सरकारने दिले आहे. शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत त्यांच्या कुटुंबियांना देण्यात येणारी मदत कोठेही बंद करण्यात आलेली नाही. या लेखाशिर्षात पुरेशी तरतूद उपलब्ध आहे. तथापि जेव्हा तरतूद नसते, तेव्हा ही गैरसोय होऊ नये म्हणून उणे प्राधिकार सुविधा वापरली जाते. मात्र, पुरेशी तरतूद उपलब्ध असल्याने ही उणे तरतूद वापरण्याची गरज नाही एवढाच त्या आदेशाचा अर्थ आहे. या बाबतीत स्वयंस्पष्ट आदेश जारी करण्यात आला आहे, असे मदत व पुनर्वसन विभागाने मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्पष्ट केले आहे.