नवी दिल्ली, 23 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या संदर्भात राष्ट्रपती भवनातून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. कर्पूरी ठाकूर यांनी मागासवर्गीयांना बळकट करण्यासाठी अनेक प्रयत्न केले होते. त्यांना ब्रिटिश राजवटीविरुद्धच्या भारत छोडो आंदोलनात तुरुंगवास भोगावा लागला होता. 1945 मध्ये तुरुंगातून बाहेर आल्यानंतर कर्पूरी ठाकूर हे हळूहळू समाजवादी चळवळीचा चेहरा बनले. 1952 मध्ये त्यांनी पहिल्यांदा निवडणूक जिंकली आणि तेव्हापासून त्यांच्या कारकिर्दीत एकही निवडणूक हरली नाही.
https://twitter.com/narendramodi/status/1749810240030445643?s=19
त्यांनी दोनदा मुख्यमंत्री म्हणून काम केले
त्यांनी मुख्यमंत्री असताना 11 नोव्हेंबर 1977 रोजी मुंगेरीलाल समितीच्या शिफारशी लागू केल्या. त्यामुळे बिहारमधील मागासवर्गीयांना सरकारी सेवांमध्ये 26 टक्के आरक्षणाचा लाभ मिळू लागला. कर्पूरी ठाकूर यांनी डिसेंबर 1970 ते जून 1971 आणि डिसेंबर 1977 ते एप्रिल 1979 पर्यंत मुख्यमंत्री म्हणून काम केले. त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात मागासवर्गीयांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. कर्पूरी ठाकूर यांचे 17 फेब्रुवारी 1988 रोजी निधन झाले.
देशवासियांना अभिमान वाटेल: नरेंद्र मोदी
कर्पूरी ठाकूर यांना आता देशाच्या सर्वोच्च अशा भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. यासंदर्भात मोदी यांनी ट्विट केले आहे. “मला खूप आनंद होत आहे की, भारत सरकारने सामाजिक न्यायाचे महान नेते कर्पूरी ठाकूर जी यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त हा निर्णय देशवासियांना अभिमान वाटेल. मागासलेल्या आणि वंचितांच्या उत्थानासाठी कर्पूरीजींची अतूट बांधिलकी आणि दूरदर्शी नेतृत्वाने भारताच्या सामाजिक-राजकीय परिदृश्यावर अमिट छाप सोडली आहे. हा भारतरत्न त्यांच्या अतुलनीय योगदानाची विनम्र ओळख तर आहेच, पण त्यामुळे समाजात एकोपा वाढीस लागेल,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.