रोहित पवार यांची उद्या ईडी चौकशी; शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे देखील सोबत जाणार

मुंबई, 23 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची उद्या (दि.24) ईडी चौकशी करणार आहे. त्यासाठी रोहित पवार हे उद्या मुंबईतील ईडीच्या कार्यालयात हजर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे हे आता रोहित पवार यांना समर्थन देण्यासाठी उद्या त्यांच्या सोबत येणार आहेत. तर या चौकशीला आपण पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. यासंदर्भात रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.

https://twitter.com/RRPSpeaks/status/1749653760241221973?s=19

पूर्णपणे सहकार्य करणार: आ. रोहित पवार

“ईडी कार्यालयात उद्या चौकशीसाठी गेल्यानंतर यापूर्वी जसं सहकार्य केलं तसंच आताही अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करणार आहे. मात्र सध्याचं सुडाचं राजकारण बघता सर्वच यंत्रणांवर सरकारचा प्रचंड दबाव असल्याने याच दबावाखाली माझ्याबाबत ईडीने काही चुकीची कारवाई केली तर कुणीही घाबरून जाऊ नये. उलट आदरणीय पवार साहेबांसोबत आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणाऱ्या व संविधानावर विश्वास असलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत सर्वांनी एकजुटीने उभं रहावं. कारण आपल्याला कुणापुढंही न झुकता महाराष्ट्राचा स्वाभिमानी बाणा टिकवायचाय आणि महाराष्ट्र धर्म जपायचाय!” असे रोहित पवार म्हणाले आहेत.

वय झालेली माणसं प्रसंगी बाप माणूस म्हणून ढाल बनून उभी राहतात: रोहित पवार

“माझ्या कुटुंबासाठी आणि कोवळ्या वयातील मुलांसाठी तर हे घाणेरडं राजकारण न समजण्याच्या पलीकडचं आहे. पण तरीही सर्वजण खंबीरपणे माझ्यासोबत आहेत. शिवाय उद्या खासदार सुप्रियाताई आणि स्वतः आदरणीय पवार साहेबही येत आहेत. वय झालं म्हणून काय झालं? वय झालेली माणसं तरुणांना संधीही देतात आणि प्रसंगी बाप माणूस म्हणून ढाल बनून उभीही राहतात. माझ्यासाठी तर हे भारावणारं आहे. या वयातही महाराष्ट्राचा हा सह्याद्री कणखरपणे पाठीशी उभा राहत असेल तर आणखी काय हवंय!” असे रोहित पवारांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *