पुणे, 23 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी आजपासून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. दि. 23 ते 31 जानेवारी या कालावधीत हे सर्वेक्षण होणार आहे. या कालावधी दरम्यान नियुक्त केलेले शासकीय अधिकारी आणि कर्मचारी घरोघरी जाऊन मराठा कुटुंबाची माहिती घेणार आहेत. याची माहिती महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने दिली आहे. यावेळी राज्यातील अंदाजे अडीच कोटी कुटूंबांचे सर्वेक्षण होणार आहे. शिक्षक, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, तलाठी असे सव्वा लाख पेक्षा जास्त प्रगणक 8 दिवसात हे काम पूर्ण करणार आहेत.
https://x.com/MahaDGIPR/status/1747927674730033539?s=20
सर्वेक्षणासाठी खास सॉफ्टवेअर बनवले
नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आयोगामार्फत सर्वेक्षणासाठी ओळखपत्र उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. तसेच सर्वेक्षणासाठी खास अत्याधुनिक सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. सर्वेक्षणा दरम्यान केवळ मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुटुंबांची माहिती प्रश्नावलीद्वारे भरून घेतली जाईल. कुटुंब आरक्षित प्रवर्गातील असल्याची माहिती प्रगणकाला मिळाल्यानंतर त्या कुटुंबाची पुढील माहिती घेतली जाणार नाही. सर्वेक्षणाचा कालावधी कमी असल्याने प्रगणक सकाळी लवकर अथवा सायंकाळी उशिरा सर्वेक्षणासाठी येऊ शकतात. तरी नागरिकांनी त्यांना आवश्यक माहिती देऊन सर्वेक्षणास सहकार्य करावे, असे आवाहन आयोगामार्फत करण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांनी घेतली होती आढावा बैठक
तत्पूर्वी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 20 जानेवारी रोजी यासंदर्भात राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांच्याशी बैठक घेतली होती. मराठा समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत युद्धपातळीवर सुरू होणाऱ्या सर्वेक्षणासाठी सर्व शासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्याची तसेच या कामाला सर्वोच्च प्राधान्य देऊन कालबद्धरितीने अचूक सर्वेक्षण करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीतून सबंधित अधिकाऱ्यांना दिले होते.