माळेगाव, 20 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) बारामतीच्या माळेगाव येथे ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्र याठिकाणी सध्या कृषिक 2024 हे कृषी प्रदर्शन सुरू आहे. या कृषी प्रदर्शनाचा आज तिसरा दिवस आहे. या प्रदर्शनाला आज पतंजलीचे आचार्य बाळकृष्ण यांनी भेट दिली. यावेळी आचार्य बालकृष्ण यांनी प्रक्षेत्रावर असलेले विविध तंत्रज्ञानाची माहिती घेतली आहे. यानंतर आचार्यांनी शेतकरी व विद्यार्थांशी संवाद साधला. सोबतच या कृषी प्रदर्शनाला आज विविध राज्यातील शेतकऱ्यांनी भेट दिली आहे.
कृषिक 2024 मध्ये अश्व प्रदर्शनाचे उद्घाटन
त्यामध्ये पंजाब, दिल्ली, हरियाणा, राजस्थान येथील शेतकऱ्यांनी या प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला. यावेळी शेतकऱ्यांचा कल हा शेतीसाठी उपयोगी असलेली विविध यंत्रसामुग्री, ट्रॅक्टरचलित अवजारे, आंतर मशागतीचे अवजारे माहिती घेण्यावरती दिसला. औषध फवारणी यंत्रे असतील किंवा इतर यंत्रांमध्ये शेतकरी माहिती घेत असताना दिसले. तसेच या कृषी प्रदर्शनात आज ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे विश्वस्त श्री. रणजीत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या अश्व प्रदर्शनाचे डॉक्टर आप्पासाहेब पवार यांनी उद्घाटन केले. या अश्व प्रदर्शनामध्ये विविध राज्यातील 100 मारवारी जातीचे घोडे सहभागी झाले होते.
प्रदर्शनात डॉग शोचे आयोजन
तसेच आज याठिकाणी डॉग शोचे देखील आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये 3 प्रजातीच्या कुत्र्यांचा सहभाग होता. त्यातील श्री रितेश नांगरे यांच्या टॉय या जातीच्या श्वानाला प्रथम क्रमांक मिळाला. त्याचबरोबर इंडियन जातीमध्ये श्री आदित्य जाधव बारामती व मिडीयम जातीमध्ये किरण दळवी, बारामती यांच्या श्वानाला प्रथम क्रमांक मिळाला. आजच्या या डॉग शोचे पारितोषक वितरण चेअरमन माननीय राजेंद्र दादा पवार यांच्या हस्ते पार पडले. तर उद्या दि. 21 जानेवारी रोजी या अश्व प्रदर्शनात महाराष्ट्रातील प्रसिद्ध भीमथडी जातीचा शो असणार आहे. त्यामध्ये सुमारे पन्नास घोडे सहभागी होतील. हे प्रदर्शन सोमवार दि. 22 जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांसाठी खुले असणार आहे. तरी याचा लाभ शेतकर्यांनी घ्यावा, असे आवाहन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रोफेसर निलेश नलावडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.