नवी मुंबईतील कांबळे दाम्पत्याला अयोध्येतील सोहळ्यात पूजा करण्याचा मान मिळाला

नवी मुंबई, 20 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन येत्या 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राम लल्लाच्या मूर्तीची पूजा करणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भगवान श्री रामाच्या मूर्तीची पूजा करण्यासाठी देशातील 11 जोडप्यांना मान मिळाला आहे. यामध्ये नवी मुंबईतील विठ्ठल कांबळे आणि उज्वला कांबळे या दाम्पत्याला श्री रामाच्या मूर्तीची पूजा मान मिळाला आहे. कांबळे दाम्पत्य हे सध्या नवी मुंबईतील खारघर परिसरात राहत आहेत. अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत पूजा करण्याचा मान मिळाल्याने कांबळे कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला आहे. या सोहळ्यासाठी कांबळे दाम्पत्य आज आयोध्येकडे रवाना झाले आहे.

1992 च्या आंदोलनात सहभागी झालेले

दरम्यान, विठ्ठल कांबळे हे पेशाने शिक्षक आहेत. तसेच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रायगड जिल्ह्याचे सेक्रेटरी आहेत. याशिवाय, 1992 च्या अयोध्येतील आंदोलनावेळी विठ्ठल कांबळे हे त्याठिकाणीच होते. त्यांना आता राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची निमंत्रण पत्रिका मिळाली आहे. त्यामुळे मंदिर लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी कांबळे दांपत्यासह 11 जोडप्यांना 15 जानेवारीपासून नियमांचे पालन करावे लागणार आहे.

कडक नियमांचे पालन करावे लागणार

यासंदर्भातील नियमावली त्यांना निमंत्रण पत्रिकेसोबत मिळाली आहे. यामध्ये त्यांना 22 जानेवारीपर्यंत 45 कडक नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. या नियमावलीत 11 जोडप्यांनी कोणती वस्त्रे परिधान करायची? काय खायचे? तसेच या सोहळ्याला कधी उपस्थित राहायचे आहे? यांसारख्या अनेक गोष्टींची माहिती देण्यात आली आहे. तर या नियमांचे कांबळे दांपत्याने पालन करण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान, विठ्ठल कांबळे आणि त्यांच्या पत्नी उज्वला कांबळे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राम लल्लाच्या मूर्तीची पूजा करण्याचा मान मिळाल्याने महाराष्ट्रासाठी देखील ही आनंदाची बाब आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *