दावोस दौऱ्यात 3 लाख 53 हजार कोटींचे विक्रमी सामंजस्य करार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

मुंबई, 19 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) स्वित्झर्लंड मधील दावोस येथे आयोजित करण्यात आलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहभाग घेतला होता. ही परिषद आटपून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल रात्री मुंबईत दाखल झाले. त्यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचे जोरदार स्वागत केले. या दौऱ्यात 3 लाख 53 हजार कोटींचे विक्रमी सामंजस्य करार झाले असून, 1 लाख कोटींच्या गुंतवणुकीबाबत परदेशी कंपन्यांनी स्वारस्य दाखवले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

अनेक नामांकित कंपन्या राज्यात गुंतवणूक करण्यासाठी तयार: मुख्यमंत्री

तसेच राज्यात येणाऱ्या या गुंतवणुकीच्या माध्यमातून 2 लाखांपर्यंत रोजगार निर्मिती होणार आहे. आर्सेनिल मित्तल, निप्पोन यांसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्या, जिंदाल, अदानी यांसारख्या देशांतर्गत नामांकित कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी स्वारस्य दाखवले आहे. जेम्स आणि ज्वेलरी, माहिती तंत्रज्ञान, हरित हायड्रोजन, हरित ऊर्जा, पेपर आणि पल्प, खाण उद्योग अशा अनेक उद्योजकांनी तसेच डेटा सेंटर, इन्फ्रास्ट्रक्चर अशा विविध सेक्टरमध्ये गुंतवणुकीला पसंती दर्शविली आहे, अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. गतवर्षी प्रमाणेच यावर्षी केलेले करार पूर्णत्वास नेण्याकडे सरकारचा कटाक्ष राहील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.



याप्रसंगी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार अमित साटम, आमदार सदा सरवणकर, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार मनीषा कायंदे, आमदार बालाजी कल्याणकर, माजी आमदार रवींद्र फाटक यांच्यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *