अयोध्या, 18 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) अयोध्येतील राम मंदिराचा उद्घाटन सोहळा येत्या 22 जानेवारी रोजी होणार आहे. या दिवशी केंद्रीय कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुट्टी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या संदर्भातील आदेशाचे पत्र केंद्र सरकारने आज जारी केले आहे. तर सरकारच्या या निर्णयामुळे 22 जानेवारी रोजी दुपारी 2:30 वाजेपर्यंत देशातील सर्व केंद्र सरकारी कार्यालये केंद्रीय संस्था आणि केंद्रीय औद्योगिक संस्था बंद राहणार आहेत.
https://x.com/ANI/status/1747916627163979994?s=20
यापूर्वी 22 जानेवारीला काही राज्यांत सुट्टी
दरम्यान, हा निर्णय जाहीर होण्यापूर्वी काही राज्यांनी 22 जानेवारी रोजी सुट्टी जाहीर केली होती. यामध्ये उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि गोवा या राज्यांत सरकारी सुट्टी जाहीर करण्यात आली होती. तर येत्या 22 जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यानिमित्त सुट्टी जाहीर करावी, अशी विनंती केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांनी केली होती. कर्मचार्यांच्या उदंड भावना आणि त्यांच्या विनंतीमुळे केंद्र सरकारने 22 जानेवारी रोजी सर्व देशातील केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर केली आहे.
पंतप्रधानांच्या हस्ते राम मंदिराचे उद्घाटन
राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहता यावे, यासाठी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, 22 जानेवारी रोजी राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम लल्लाच्या मूर्तीचा अभिषेक सोहळा पार पडणार आहे. तर या दिवशी देशातील सर्व नागरिकांनी दिवाळी साजरी करून त्यांच्या घरी दिवे लावावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, साधू संत, अनेक सेलिब्रिटी आणि विविध मान्यवरांना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, 22 जानेवारी रोजी अयोध्या परिसरात मोठी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.