जागतिक आर्थिक परिषदेत राज्याने 3 लाख 10 हजार 850 कोटींचे सामंजस्य करार केले, मुख्यमंत्र्यांची माहिती

दावोस, 18 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) स्विझरलँड मधील दावोस येथे सध्या 54 वी जागतिक आर्थिक परिषद सुरू आहे. या परिषदेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महाप्रित आणि ग्रीन एनर्जी 3000 यांच्यात 40 हजार कोटींच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे. या करारांतर्गत राज्यातील सौर ऊर्जा धोरणाला अनुसरून सौर ऊर्जा पार्क, पवन ऊर्जा, हायब्रीड पॉवर प्लांटस उभारण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात एक हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट असून ही क्षमता सोलर, हायब्रीड एनर्जी आणि बॅटरी एनर्जी स्टोरेजच्या सहाय्याने 10 हजार मेगावॅटपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. तर या करारावर महाप्रितचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अमोल शिंदे यांनी स्वाक्षरी केली आहे.

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1747870626080227442?s=19

आज 42 हजार 825 कोटींचे करार होणार

तत्पूर्वी, स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्राने 3 लाख 10 हजार 850 कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले आहेत. तर आज 42 हजार 825 कोटींचे करार होणार आहेत. अशा रितीने एकूण 3 लाख 53 हजार 675 लाख कोटींचे विक्रमी सामंजस्य करार करीत असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. याशिवाय 1 लाख कोटींच्या गुंतवणुकीत उद्योगांनी स्वारस्य दाखवले असल्याने राज्यावर जागतिक उद्योग आणि गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1747653312273666227?s=19

महाराष्ट्राला गुंतवणुकीचे सर्वोच्च राज्य बनवण्याला प्राधान्य: मुख्यमंत्री

दरम्यान, स्वित्झर्लंडमधील दावोस येथे 15 ते 19 जानेवारी या कालावधीत जागतिक आर्थिक परिषदेची बैठक पार पडणार आहे. या परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिष्टमंडळासमवेत सहभागी झाले आहेत. “जागतिक आर्थिक परिषदेसाठी दावोस इथे यावर्षी मी पुन्हा आलो आहे. गेल्या वर्षी याच ठिकाणी विविध उद्योग-कंपन्यांबरोबर केलेल्या करारांमधून त्याची प्रभावी अंमलबजावणी करुन राज्याच्या गतीला चालना दिली आहे. महाराष्ट्राला गुंतवणुकीचे सर्वोच्च राज्य बनविणे आणि ते टिकवून ठेवणे याला आमच्या सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *