दावोस येथे जागतिक आर्थिक परिषदेची बैठक; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज उपस्थित राहणार

दावोस, 16 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) स्वित्झर्लंडमधील दावोस येथे 15 ते 19 जानेवारी या कालावधीत जागतिक आर्थिक परिषदेची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दावोस येथे शिष्टमंडळासह उपस्थित राहणार आहेत. या परिषदेतील बैठकीत ते नागरी क्षेत्रातील आव्हाने, नाविन्यपूर्ण उपक्रम व शाश्वत विकास या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गौतम अदानी यांची या परिषदेत उद्या भेट होणार आहे. या परिषदेत प्रथमच 3 लाख 10 हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात येणार आहेत. याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1746862197396082970?s=19

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1746863016451424449?s=19

10 जणांचे शिष्टमंडळ दावोसला जाणार

मुख्यमंत्र्यांसह या शिष्टमंडळात उद्योग मंत्री उदय सामंत तसेच उद्योग विभाग, एमआयडीसी आणि मुख्यमंत्री सचिवालयातील वरिष्ठ अधिकारी अशा 10 जणांचा समावेश आहे. याशिवाय या बैठकीत एमएमआरडीए आणि महाप्रित येथील 8 अधिकारी देखील स्वतंत्ररित्या सहभागी होत असून, या सर्वांना केंद्र शासनाची मान्यता मिळाली आहे. तसेच या दौऱ्यामध्ये खाजगी विमानाचा वापर केला जाणार नाही, असेही प्रशासनाच्या वतीने स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे.

अनेक महत्त्वपूर्ण करार करण्यात येणार!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दावोस येथे महाराष्ट्राचे शिष्टमंडळ सहभागी होण्याची ही दुसरी वेळ आहे. गेल्या वर्षी या परिषदेत 1 लाख 37 हजार कोटींचे गुंतवणूक करार झाले होते. त्यापैकी 76 टक्के करार प्रत्यक्षात आले आहेत. यंदा या परिषदेच्या माध्यमातून सुमारे अडीच लाख कोटीची गुंतवणूक होईल असे नियोजन आहे. ही गुंतवणूक वाढू देखील शकते. पोलाद, माहिती तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान क्षेत्राशी निगडीत उद्योग, आण्विक ऊर्जा व नवीकरणीय ऊर्जा स्त्रोत – ग्रीन हायड्रोजन, हिरे व आभूषणे, डेटा सेंटर, लॉजिस्टिक्स, ऑटोमोटिव्ह त्याचबरोबर कृषि- औद्योगिक, कृषि आणि वनोपज यांचे मूल्यवर्धन करणारे उद्योग यावेत, यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार, या परिषदेत 20 सामंजस्य करार केले जातील. अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1746864652812955746?s=1

मुख्यमंत्री महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन करणार

या परिषदेसाठी यंदाही भारताच्या दालनाजवळ महाराष्ट्राचे अद्ययावत असे दालन उभारण्यात आले आहे. याठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात येतील. तसेच यावेळी मुख्यमंत्री हे प्रमुख विदेशी उद्योगाच्या प्रमुखांशी देखील चर्चा करणार आहेत. यासाठी या दालनात बैठक कक्ष बनविण्यात आले आहेत. याठिकाणी महाराष्ट्राच्या घोडदौडीची माहिती देणारे दृक श्राव्य प्रदर्शन देखील भरविण्यात आले आहे. या महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज होणार आहे.

प्रमुख अधिकाऱ्यांसह मुख्यमंत्री शिंदे चर्चा करणार

सोबतच या जागतिक आर्थिक परिषदेत मुख्यमंत्री शिंदे हे मिशेल एडब्ल्यूएस, लिकस्टनस्टाईनचे राजकुमार, हिताची कंपनीचे एमडी, कार्ल्सबर्ग ग्रुप, दस्सो सिस्टिम्स, व्होल्व्हो कार्स यांसारख्या प्रमुख अधिकाऱ्यांसह बैठकीला उपस्थित राहणार आहेत. यावेळी स्विसच्या भारतातील राजदूतांसमवेत चर्चा देखील होणार आहे. यामध्ये 8 कंपन्यांचे सामंजस्य करार केले जातील. याशिवाय इतरही प्रमुख कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, माध्यम समूहाचे प्रमुख आदींशी मुख्यमंत्र्यांसह उद्योग मंत्री आणि प्रतिनिधी मंडळातील सदस्य संवाद साधणार आहेत. याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *