नवी दिल्ली, 12 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी ‘पीएम किसान ट्रॅक्टर योजना’ सुरू केल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करताना अनुदान देत असल्याचे म्हटले जात होते. मात्र सोशल मीडियावरील हा दावा खोटा ठरला आहे. केंद्र सरकार पीएम किसान ट्रॅक्टर योजना अशा नावाची कोणतीही योजना राबवत नसल्याचे पीआयबी फॅक्ट चेकने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात पीआयबीने या योजनेची सत्यता पडताळून बघितली आहे.
https://twitter.com/PIBFactCheck/status/1745385108117639496?s=19
व्हायरल मेसेज खोटा निघाला
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक मेसेज चांगलाच व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये असा दावा केला जात आहे की, “केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ‘पीएम किसान ट्रॅक्टर योजना’ सुरू केली आहे. सोबतच या मेसेजमध्ये एका वेबसाईटची लिंक देखील दिलेली आहे. या वेबसाईटवर लॉगिन करून योजनेचा लाभ घ्यावा, असे या व्हायरल मेसेजमध्ये सांगण्यात आले आहे. मात्र, केंद्र सरकारच्या पीआयबीने हा व्हायरल होणारा मेसेज बनावट असल्याचे स्पष्ट केले आहे.
केंद्र सरकार पीएम किसान ट्रॅक्टर योजना राबवत नाही: पीआयबी
तत्पूर्वी, पीआयबी फॅक्ट चेकने या व्हायरल होणाऱ्या मेसेज संदर्भात खुलासा करताना ट्विट केले आहे. “केंद्र सरकारने पीएम किसान ट्रॅक्टर योजना नावाची कोणतीही अनुदान योजना सुरू केलेली नाही. तर अनुदानावर ट्रॅक्टर देण्याचा दावा करणारी ही वेबसाइट खोटी असून त्यावर विश्वास ठेऊ नये. केंद्र सरकार अशी कोणतीही योजना राबवत नाही,” असे पीआयबीने यामध्ये म्हटले आहे. त्यामुळे केंद्र सरकार पीएम किसान ट्रॅक्टर योजना राबवत नसल्याचे सिद्ध झाले आहे. दरम्यान पीआयबीने यापूर्वी अनेकदा व्हायरल होणाऱ्या मेसेज संदर्भातील सत्यता सर्वांपुढे आणलेली आहे.