पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा अफगाणिस्तानवर 6 गडी राखून विजय

मोहाली, 11 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा 6 गडी राखून पराभव केला आहे. मोहालीच्या स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात अफगाणिस्तान संघाने भारताला 159 धावांचे लक्ष्य दिले होते. भारताने त्यांचे हे लक्ष्य 4 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. याबरोबरच भारताने 3 सामन्यांच्या या टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताच्या या विजयाचा हिरो शिवम दुबे हा ठरला आहे. त्याने या सामन्यात भारताकडून नाबाद 60 धावांची खेळी केली. सोबतच त्याने गोलंदाजीत एक विकेट देखील घेतली.

https://twitter.com/BCCI/status/1745488496423505977?s=19

टॉस जिंकून भारताची प्रथम गोलंदाजी

तत्पूर्वी, आजचा सामना मोहालीच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर झाला. मोहालीत आज खूपच थंडी होती. त्यामुळे या संपुर्ण सामन्यात धुक्याचे वातावरण होते. त्यामुळे खेळाडूंना क्षेत्ररक्षण करताना अडचणींचा सामना करावा लागत होता. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी फलंदाजी करण्यासाठी आलेल्या अफगाणिस्तान संघाने सावध सुरूवात केली. त्यानंतर अफगाणिस्तान संघाला डावाच्या आठव्या आणि नवव्या षटकात दोन मोठे धक्के बसले. त्यावेळी आठव्या षटकात त्यांचा सलामीवीर रहमानउल्ला गुरबाज 28 चेंडूत 23 धावा करून बाद झाला. तो अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर बाद झाला.

मोहम्मद नबीच्या सर्वाधिक 42 धावा 

त्यानंतर त्यांचा कर्णधार इब्राहिम झद्रानने 22 चेंडूत 25 धावांची खेळी केली. त्याला नवव्या षटकात शिवम दुबेने बाद केले. त्यानंतर मोहम्मद नबीने अफगाणिस्तान कडून सर्वाधिक 42 धावांची खेळी खेळली. त्याला अजमतुल्ला उमरझाई याने 29 धावा करून चांगली साथ दिली. या दोघांना मुकेश कुमारने एकाच षटकात बाद केले. या दोघांच्या भागीदारीमुळे अफगाणिस्तानला 20 षटकांत 158 धावा करता आल्या. भारताकडून मुकेश कुमार आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. तर शिवम दुबेने एक गडी बाद केला.

रोहित शर्मा शून्यावर धावबाद!

त्यानंतर प्रत्युत्तरात खेळताना भारताच्या डावाची सुरूवात खराब झाली. भारताचा कर्णधार रोहित शर्मा खाते न उघडता धावबाद झाला. त्यावेळी रोहित शर्मा शुभमन गिलवर खूपच संतापलेला पाहायला मिळाला. त्यानंतर शुभमन गिल 23 धावांची खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने 12 चेंडूत 23 धावा केल्या. मग शिवम दुबे आणि तिलक वर्मा या जोडीने भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी चांगली फलंदाजी केली. मात्र, संघाची 72 धावसंख्या असताना तिलक वर्मा 26 धावांवर बाद झाला.

https://twitter.com/BCCI/status/1745491661088813476?s=19

शिवम दुबे ठरला सामनावीर!

त्यानंतर भारताचा विकेटकिपर जितेश शर्माने 20 चेंडूत 31 धावांची खेळी केली. तो फटकेबाजी करण्याच्या नादात बाद झाला. तर दुसरीकडे, शिवम दुबेने एका बाजूने अफगाणिस्तानच्या गोलंदाजांवर हल्ला चढवत उत्कृष्ट फलंदाजी केली. शिवम दुबेने 40 चेंडूत नाबाद 60 धावांची शानदार खेळी करून भारताला विजय मिळवून दिला. यावेळी रिंकू सिंग 9 चेंडूत 16 धावांची खेळी करून नाबाद राहिला. अफगाणिस्तानकडून मुजीब उर रहमानने सर्वाधिक 2 गडी बाद केले. तर अजमतुल्ला उमरझाई याने एक गडी बाद केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *