सोशल मीडियावरून 4.56 कोटींची आर्थिक फसवणूक; पोलिसांनी 48 तासांच्या आत लावला छडा

मुंबई, 10 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) मुंबईत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करून आकर्षक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल 4 कोटी 56 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यासंदर्भात मुंबई पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा 48 तासांच्या आत छडा लावून आरोपीचे बँक खाते गोठवले. यावेळी पोलिसांनी फसवणूक झालेल्या रकमेतील 3 कोटी 80 लाख रुपयांची रक्कम तक्रारदाराला परत केली आहे. याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

https://twitter.com/MumbaiPolice/status/1744998102526984459?s=19

पोलिसांची तात्काळ कारवाई

दरम्यान, मुंबई पोलिसांच्या 1930 या सायबर हेल्पलाईन क्रमांकावर एका व्यक्तीने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये 4 कोटी 56 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार केली होती. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून आकर्षक परतावा मिळवून देतो, असे त्या व्यक्तीने म्हटले असल्याचे तक्रारदाराने पोलिसांना सांगितले. त्यानंतर मुंबई पोलीस गुन्हे शाखा, मुंबई मा.पोलीस सह आयुक्त गुन्हे शाखा आणि अपर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त डॉ. डी.एस.स्वामी, पोलीस उपनिरीक्षक रुपाली कुलथे, पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोर आणि सायबर पथक यांनी तात्काळ कारवाई करून 48 तासांच्या आत फसवणूक झालेल्या रकमेतील 3 कोटी 80 लाख रुपये विविध बँक खात्यांवर गोठवण्यात यश मिळविले.

पोलिसांचे नागरिकांना आवाहन

यावेळी मुंबई पोलिसांनी सायबर गुन्ह्यांत आर्थिक फसवणूक झाली तर लगेचच पोलिसांत तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. “सायबर गुन्ह्यांमध्ये आर्थिक फसवणूक झाल्यास तात्काळ जवळचे पोलीस ठाणे किंवा 1930 सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधावा, जेणेकरून लवकरात लवकर संपर्क केल्यामुळे कारवाई करण्यास व फसवणूक झालेली रक्कम गोठवण्यात मदत होईल,” असे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *