मुंबई, 10 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या याचिकांवर आज दुपारी 4 वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल देणार आहेत. या निकालाच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. “शिवसेना पक्ष म्हणून निवडणूक आयोगाने आम्हाला अधिकृत मान्यता दिली आहे. तसेच धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने आम्हाला दिलं. सोबतच शिवसेना अधिकृत पक्ष निवडणुक आयोगाने आम्हाला दिला आहे,” असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले आहेत.
https://twitter.com/mieknathshinde/status/1744977601268273592?s=19
आम्हीच अधिकृत शिवसेना पक्ष!
विधानसभेमध्ये आमच्याकडे 67 टक्के बहुमत आणि लोकसभेत आमच्याकडे 75 टक्के बहुमत आहे, त्यामुळे निवडणूक आयोगाने आम्हाला अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. असे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. तसेच एकनाथ शिंदे यांनी यावेळी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. लोक आता मॅच फिक्सिंगचा आरोप करत आहेत. त्यांचे आमदार, विरोधी पक्षाचे लोक मग अध्यक्षांच्या केबिनमध्ये जेवत होते, त्यावर आम्ही आक्षेप घेतला का? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी यावेळी उपस्थित केला.
नार्वेकरांच्या भेटीवर स्पष्टीकरण
“अध्यक्ष त्या दिवशी माझ्याकडे आले, ते अधिकृतपणे त्यांच्या वाहनातून आले होते. ते रात्री लपून आले नाहीत. दिवसाच्या उजेडामध्ये आले आणि त्यांच्या मतदारसंघांमध्ये जे काम सुरू आहे. यांतील कोस्टल हायवे, मरीन ड्राईव्ह मी स्वतः या कामांना भेट दिली होती. तसेच ते आमदार आहेत त्यामुळे त्यांचे जे काही काम मतदार संघातील इतरही काही विषय होते. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी ते आले होते. आणि अधिकार्यांच्या सोबत अधिकृत बैठक झाली, लपून छपून बैठक झालेली नाही. त्यामुळे जे लोक चोराच्या मनात चांदणं असतं, लपून छपून बैठका करणाऱ्या अंधारामध्ये त्या करत नाही. आमचं काम अगदी स्पष्ट असतं. त्यामुळे त्यांच्या बोलण्यामध्ये काही तथ्य नाही. जेव्हा त्यांच्या बाजूने निकाल लागतो ही संस्था चांगली असते. जेव्हा त्यांच्या विरोधात निकाल लागतो तेव्हा हायकोर्ट असो वा सुप्रीम कोर्ट असो यांच्यावर टीका करण्याचे प्रकार त्यांनी अनेकदा केलेले आहेत.” असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
आमचे बहुमताचे सरकार आहे!
अध्यक्ष महोदयांनी आमच्या बाजूने मेरिटवर निकाल दिला पाहिजे. कारण पक्ष आम्ही आहोत, धनुष्यबाण आमच्याकडे आहे. सुप्रीम कोर्टाने देखील आपल्या निकालामध्ये म्हटलेलं आहे की त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यामुळे या सरकार अस्तित्वात नव्हतं आणि आमच्याकडे 164 आमदारांचे बहुमत होते. त्यामुळे आमचे बहुमताचे सरकार आहे. त्यामुळे जे घटनाबाह्य सरकार म्हणून आरोप करतायेत त्यांनी सुप्रीम कोर्टाचा हा निकाल वाचावा, असे शिंदे यांनी म्हटले आहे.