नवी दिल्ली, 09 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी मोहम्मद शमीसह 26 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला. मोहम्मद शमीने नुकत्याच पार पडलेल्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी करत 24 विकेट घेतल्या होत्या. या कामगिरीबद्दल बीसीसीआयने शमीच्या नावाची अर्जून पुरस्कारासाठी शिफारस केली होती. त्यामुळे अर्जुन पुरस्कार मिळवणारा मोहम्मद शमी हा 58 वा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याचबरोबरच यंदाच्या वर्षी अर्जुन पुरस्कार पटकावणारा शमी हा एकमेव क्रिकेटपटू ठरला आहे.
https://twitter.com/ANI/status/1744598524480897396?s=19
स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद: शमी
तर अर्जुन पुरस्कार मिळाल्याबद्दल मोहम्मद शमीने आनंद व्यक्त केला आहे. “हा पुरस्कार मिळवण्याचे एक स्वप्न असते. आयुष्य निघून जाते, पण अनेक लोक हा पुरस्कार जिंकू शकत नाहीत. या पुरस्कारासाठी माझी निवड झाल्याचा मला आनंद आहे,” अशी प्रतिक्रिया मोहम्मद शमीने यावेळी दिली. दरम्यान, मोहम्मद शमी हा विश्वचषक स्पर्धा झाल्यापासून दुखापतीमुळे भारतीय संघाबाहेर आहे. त्याच्या घोट्याला दुखापत झाली आहे. याच कारणामुळे त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळता आले नव्हते. तर मोहम्मद शमी हा आगामी इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत पुनरागमन करण्याची शक्यता आहे.
https://twitter.com/ANI/status/1744381335836487922?s=19
सात्विक-चिराग यांना खेलरत्न!
राष्ट्रपती भवनात आज राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आले. हा पुरस्कार सोहळा देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पार पडला. यावेळी मोहम्मद शमीसह 26 खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच या सोहळ्यात बॅडमिंटनमधील सात्विक आणि चिराग या जोडीला खेलरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. सोबतच या पुरस्कार सोहळ्यात 5 प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.