मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अयोध्येतील राम मंदिराच्या सोहळ्याचे निमंत्रण मिळाले

ठाणे, 09 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) अयोध्या येथील प्रभू श्री रामाच्या मंदिराचे येत्या 22 जानेवारी रोजी उद्घाटन होणार आहे. या सोहळ्यासाठी अनेक मान्यवरांना निमंत्रणे पाठवली जात आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण मिळाले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत संपर्कप्रमुख अजय जोशी आणि विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त क्षेत्र संपर्कप्रमुख संजय ढवळीकर यांनी एकनाथ शिंदे यांची ठाणे येथील निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला उपस्थित रहाण्यासाठी निमंत्रण पत्रिका दिली. याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

https://twitter.com/mieknathshinde/status/1744247193178152978?s=19

मुख्यमंत्री अयोध्येला जाणार!

“अयोध्येतील श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा येत्या 22 जानेवारी रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे. शिवसेनेचा मुख्य नेता म्हणून आज या सोहळ्याचे आमंत्रण मला देण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत संपर्कप्रमुख अजय जोशी आणि विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त क्षेत्र संपर्कप्रमुख संजय ढवळीकर यांनी ठाणे येथील निवासस्थानी येऊन मला अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला उपस्थित रहाण्यासाठी आमंत्रित केले. या आमंत्रणाचा विनम्रपणे स्वीकार केला. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार होताना पाहण्यासाठी अयोध्येला जाणार आहे,” असे ट्विट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाच्या वतीने अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी 11 कोटी रुपयांची देणगी दिली होती.

पंतप्रधान सोहळ्याला उपस्थित राहणार

तत्पूर्वी, येत्या 22 रोजी अयोध्येतील प्रभू श्री रामाच्या मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या सोहळ्यासाठी सध्या देशभरातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांना आमंत्रित केले जात आहे. या पार्श्वभूमीवर, अयोध्येतील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. तर या सोहळ्याची देशभरातील नागरिक आतुरतेने वाट पाहत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *