मुंबईतील संग्रहालयांना बॉम्बस्फोटाची धमकी मिळाली

मुंबई, 06 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) मुंबईतील अनेक प्रमुख संग्रहालयांना बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी दिली आहे. कुलाब्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय आणि वरळीतील नेहरू सायन्स सेंटरसह प्रमुख संग्रहालयांना स्फोटाची धमकी देण्यात आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने या संग्रहालयांना ईमेल पाठवून ही धमकी दिली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी या संग्रहालयांची कसून तपासणी केली. या संदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

https://twitter.com/ANI/status/1743318402125660332?s=19

खोटी धमकी देण्यात आली

दरम्यान, कुलाब्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय आणि वरळीतील नेहरू सायन्स सेंटरसह प्रमुख संग्रहालयांना स्फोटाची धमकी देणारे ईमेल प्राप्त झाले होते. त्यानंतर तातडीने मुंबई पोलीस आणि बॉम्ब निकामी पथकाने ज्या संग्रहालयांना ईमेल प्राप्त झाले होते, त्यांची कसून चौकशी केली. मात्र, या चौकशीत त्यांना कोणतीही स्फोटके सापडली नाहीत, याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. तर धमकीचा ईमेल पाठविणाऱ्या व्यक्तीचा सध्या पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी, अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

यापूर्वीही अनेकदा मिळाली होती धमकी!

तत्पूर्वी, गेल्या काही काळामध्ये धमकीचे फोन, मेसेज किंवा ईमेल येण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. काही दिवसांपूर्वी नववर्षाची जय्यत तयारी सुरू असताना मुंबई पोलिसांना धमकीचा फोन आला होता. त्यावेळी हा फोन करणाऱ्या व्यक्तीने मुंबईत बॉम्बस्फोट होणार असल्याचा दावा केला होता. तसेच यापूर्वी, प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना देखील अनेकदा धमकीचे फोन आणि मेसेज आले होते. याचा तपास मुंबई पोलिसांनी केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *