ट्रक चालकांच्या संपाला जितेंद्र आव्हाड यांचा पाठिंबा

मुंबई, 02 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) केंद्र सरकारच्या नवीन ‘हिट अँड रन’ या कायद्याच्या विरोधात देशभरातील बस आणि ट्रक चालक यांनी संप पुकारला आहे. या संपाचा फटका पेट्रोल डिझेल, गॅस, भाजीपाला आणि खाजगी बससेवा यांना बसला आहे. दरम्यान, या संपाला राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या संपाबाबतची त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

https://twitter.com/Awhadspeaks/status/1741891650304020856?s=19

“केंद्र सरकारने जे कायद्यामध्ये बदल केले आहेत. त्यामध्ये अपघातात जर कोणी मरण पावले तर वाहनचालकाला दहा वर्ष कैद आणि दहा ते पंधरा लाख रूपये दंड, अशी शिफारस करण्यात आली आहे. मूळात अपघात कसा झाला, अपघाताला जबाबदार कोण, याची कुठलीही तपासणी करण्याची तरतूद यामध्ये ठेवलेली नाही. एकतर जेवढ्या ट्रकचालकांची गरज आहे. त्यापेक्षा 40% कमी ट्रकचालक भारतात उपलब्ध आहेत. असे जर राक्षसी कायदे करण्यात आले तर कुणीही ट्रकचालक म्हणून काम करण्यास तयार होणार नाही. हाच कायदा पुढे कारचालकांनाही लागू होणार आहे.” असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.



“एखाद्याने चुकीच्या पद्धतीने रस्ता ओलांडला अन् अपघात झाला तर शिक्षा रस्ता ओलांडणाऱ्याला की ट्रकचालकाला द्यायची? सर्व अपघात हे वाहनचालकांच्या चुकीमुळेच होतात, हे म्हणणे कितपत योग्य आहे? म्हणजेच भारतीयांना फक्त जेलचीच भीती दाखवायची, एवढेच काम आता सरकारचे उरले आहे. यात व्यावहारिक दृष्टिकोन ठेवायचाच नाही, ही कुठली पद्धत आहे ? जिथे रस्ता ओलांडायचा नसतो; तिथे रस्ता ओलांडला अन् अपघात झाला तर त्याच्या घरच्यांना दहा लाखांचा दंड आकारणार का? त्याच्या घरच्यांवर ती जबाबदारी टाकणार का ?” असे सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केले आहेत.



“कित्येक वेळा चुकीच्या पद्धतीने रस्ता ओलांडणाऱ्याला वाचवताना अपघात घडतो आणि त्यात चालक दगावतात, याची जबाबदारी कोणावर? तेव्हा कुठलाही कायदा करताना सर्व बाजूने त्याची तपासणी करून त्याचा अंमल करावा, अशी अपेक्षा असते. एकतर्फी विचार करून कायदा होऊच शकत नाही. ट्रकचालकांनी या कायद्याला विरोध केला आहे. माझा ट्रकचालकांच्या या भूमिकेला पूर्ण पाठिंबा आहे.” असे जितेंद्र आव्हाड यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *