मराठा आरक्षण संदर्भात आज राज्य सरकारची उच्चस्तरीय बैठक; जरांगे पाटील उपस्थित राहणार

मुंबई, 02 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) राज्य सरकारने मराठा आरक्षण संदर्भात उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. ही बैठक आज दुपारी 4 वाजता मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि विविध मंत्री यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे देखील या बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहणार आहेत. दरम्यान मराठा आरक्षण संदर्भात आजची बैठक महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे या बैठकीत मराठा आरक्षणावर काही निर्णय होणार का? याकडे मराठा समाज बांधवांचे लक्ष लागले आहे.



दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मनोज जरांगे पाटील यांना फोन करून आजच्या बैठकीत सहभागी होण्यास सांगितले होते. मात्र, जरांगे पाटील यांनी या बैठकीला प्रत्यक्षपणे सहभागी होण्यास नकार दिला आहे. चार भिंतीच्या आत चर्चा करण्यास माझा पहिल्यापासूनच नकार आहे, असे जरांगे पाटलांनी म्हटले आहे. आम्ही आमचे म्हणणे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. आम्ही सरसकट मराठा आरक्षणावर ठाम आहोत. सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे, अशी आमची मागणी आहे. तसेच मराठा आरक्षण संदर्भात आजच्या दिवशी राज्य सरकार 4 बैठका घेणार असल्याची माहिती देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. आजच्या बैठकीतील नेमका काय विषय आहे? जे जाणून घेण्यासाठी मी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत उपस्थित राहणार आहे, असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.



तसेच राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेतला नाही तर आम्ही 20 तारखेला मुंबईला जाणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. तत्पूर्वी, जरांगे पाटील यांनी राज्यात मराठा आरक्षण लागू करण्यासाठी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली होती. ही मुदत संपल्यानंतर जरांगे पाटलांनी 20 जानेवारी रोजी मुंबईत आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली होती. तर ही तारीख आता जवळ येत चालली आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकार आता बैठका घेताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *