मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे उद्घाटन 12 जानेवारीला पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

मुंबई, 31 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) मुंबई ट्रान्स हार्बर लिंक या सागरी पूलाच्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक या पूलाचे येत्या 12 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. त्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. हा पूल देशातील सर्वात मोठा सागरी पूल आहे. हा पूल मुंबई ते नवी मुंबईला जोडलेला आहे.

https://twitter.com/ANI/status/1741354525427220990?s=19

सुमारे 22 किमी लांबीचा हा पूल आहे

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा पूल 22 किलोमीटर लांबीचा असून, हा प्रकल्प 6 लेनचा आहे. या पुलाचा 16.5 किमी भाग समुद्रावर बांधला आहे. तर उर्वरित 5.5 किमीचा भाग जमिनीवर बांधण्यात आला आहे. या पूलावरून वाहतूक सुरू झाल्यानंतर मुंबईतील शिवडी ते नवी मुंबईतील चिर्ले येथे 15 ते 20 मिनिटांत पोहोचणे शक्य होणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीच्या त्रासातून मुंबईकरांची सुटका होईल. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा पूल 18 हजार कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे.

ओपन रोड टोलिंगची सुविधा

तसेच हा पूल सुरू झाल्यानंतर मुंबईहून गोव्याला लवकर पोहोचणे शक्य होणार आहे. दरम्यान वाहतूक सुरू झाल्यानंतर या पुलावरून एका दिवसात 70 हजार वाहने जातील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा भारतातील पहिला पूल असेल ज्यात ओपन रोड टोलची सुविधा उपलब्ध असणार आहे. याचा अर्थ यामध्ये अनेक टोलनाके नसणार आहेत. या सुविधेमुळे वाहनचालक न थांबता इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टोल भरू शकणार आहेत. तर या सागरी पूलामुळे राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यास आणखी मदत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *