मुंबई, 31 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) गेल्या काही दिवसांपासून धमकीचे फोन येणाऱ्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशातच मुंबई पोलिसांना पुन्हा एकदा धमकीचा फोन आला आहे. मुंबईत अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट होणार असल्याचा दावा या अज्ञात व्यक्तीने केला आहे. या पार्श्वभूमीवर, मुंबई पोलीस सतर्क झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी सुरू केला आहे. पोलीस सध्या हा फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.
https://x.com/ANI/status/1741301122068054458?s=20
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, त्या अज्ञात व्यक्तीने हा फोन काल सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास केला होता. त्यावेळी या अज्ञात व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून मुंबईत अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट होणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर या व्यक्तीने हा फोन लगेचच कट केला. सध्या या व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत. तसेच पोलीस सध्या या फोन कॉलची माहिती गोळा करीत आहेत. मात्र, यामध्ये पोलिसांना अद्याप काहीही संशयास्पद आढळलेले नाही, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, नववर्षाच्या जल्लोषाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. प्रत्यक्षात या काळात मुंबई पोलिस दलातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नववर्षाचे स्वागत करीत असताना मुंबईत कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी मुंबईत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यावेळी पोलीस संशयास्पद हालचालींवर नजर ठेवून असणार आहेत.