अयोध्या, 29 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) अयोध्येतील नव्याने बांधण्यात आलेल्या राम मंदिरात पुढील महिन्यात प्रभू रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात कोणती मूर्ती ठेवायची याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. यासाठी आज मतदान होणार आहे. हे मतदान झाल्यानंतर राम मंदिराच्या गाभाऱ्यात कोणती मूर्ती ठेवायची? यासंदर्भातील निर्णय घेण्यात येणार आहे. अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या बांधकाम आणि व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवण्यात आलेल्या श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राच्या बैठकीत हे मतदान होणार आहे.
https://twitter.com/ani_digital/status/1740572529306329346?s=19
यावेळी वेगवेगळ्या शिल्पकारांनी बनवलेल्या तिन्ही डिझाईन्स टेबलवर ठेवल्या जातील. यापैकी ज्या मूर्तीला सर्वाधिक मते मिळतील, ती मूर्ती 22 जानेवारीला मंदिराच्या अभिषेक वेळी मंदिराच्या गाभाऱ्यात बसविण्यात येईल. याआधी ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी म्हटले होते की, पाच वर्षांच्या रामलल्लाला प्रतिबिंबित करणारी 51 इंच उंचीची प्रभू रामाची मूर्ती तीन डिझाइनमधून निवडली जाईल.
दरम्यान, श्री राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी गुरुवारी उच्च जिल्हा अधिकाऱ्यासह रामजन्मभूमी मार्ग आणि संकुलावर सुरू असलेल्या बांधकामाचा आढावा घेतला. पुढील महिन्यात होणा-या अभिषेक समारंभाच्या आधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंदिराच्या शहराला भेट देण्याच्या दोन दिवस आधी ही तपासणी करण्यात आली. “हे काम घाईत केले जात नाही, तर पुरेसा वेळ देऊन दर्जेदार पद्धतीने केले जात आहे,” असे नृपेंद्र मिश्रा यावेळी म्हणाले.
तत्पूर्वी, या मंदिराच्या बांधकामाचे तीन टप्प्यात वर्गीकरण करण्यात आले आहे. यांतील पहिला टप्पा डिसेंबर महिन्यात पूर्ण होईल. दुसऱ्या टप्प्यात मंदिराचे बांधकाम जानेवारीमध्ये पूर्ण होईल. तसेच तिसऱ्या टप्प्यात जटिल बांधकाम करण्यात येईल. याशिवाय जन्मभूमी मार्गावर वेलकम गेट आणि छत बसविण्यात येणाऱ्या सुरक्षा उपकरणांचे काम डिसेंबरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याच्या सूचना ही मिश्रा यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मंदिर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक सोहळा हा 16 जानेवारीपासून सात दिवसांच्या कालावधीत पार पडणार आहे.