भारतात कोरोनाचे इतके नवे रुग्ण!

मुंबई, 25 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 656 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशात कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या आता 3 हजार 742 इतकी झाली आहे. या रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तसेच यादरम्यान देशात गेल्या 24 तासांत एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.



देशात कालच्या दिवशी 656 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यांतील बहुतांश रुग्ण हे केरळमधील आहेत. केरळमध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाचे 128 नवे रुग्ण आढळले आहेत. तर कर्नाटकात कोरोनाच्या 96 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान महाराष्ट्रात देखील सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 50 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.



त्यामुळे राज्यातील आरोग्य विभागाची काळजी वाढली आहे. तर राज्यात कालच्या दिवशी आढळलेल्या या 50 रुग्णांमध्ये कोरोनाच्या जेएन-1 या व्हेरिएंटचे 9 नवे रुग्ण आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात जेएन-1 ची लागण झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आता 10 झाली आहे. जेएन-1 रुग्णांमध्ये ठाणे शहरातील 5, पुणे शहरातील 2 आणि पुणे जिल्ह्यातील एक, अकोला शहर एक आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका रुग्णांचा समावेश आहे. त्यांची प्रकृती सध्या बरी आहे. या पार्श्वभूमीवर, लोकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *