विदेशी सापांची तस्करी करणाऱ्या व्यक्तीला अटक

मुंबई, 23 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे सापांची तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीला महसूल गुप्तचर संचालनालय अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. सध्या या व्यक्तीची कसून चौकशी केली जात आहे. हा व्यक्ती बँकॉकहून मुंबईत आला होता. त्यावेळी या व्यक्तीला महसूल गुप्तचर संचालनालयाने मुंबई विमानतळावर अडवले. त्यानंतर त्याच्या सामानाची त्यांनी तपासणी केली. या तपासणीदरम्यान महसूल गुप्तचर संचालनालय अधिकाऱ्यांना त्याच्या बॅगमध्ये बिस्कीट आणि केकची पाकिटे सापडली.

https://twitter.com/ANI/status/1738265868222804032?s=19

या पाकिटांमध्ये त्याने साप लपवून ठेवले असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. हा प्रकार पाहून त्यांना धक्काच बसला. या पाकिटांमध्ये 9 पायथन रेगियस प्रजातीचे अजगर आणि पॅन्थेरोफिस गट्टाटस या प्रजातीचे 2 साप आढळून आले आहेत. हे सर्व साप महसूल गुप्तचर संचालनालयाने सीमाशुल्क कायदा 1962 अंतर्गत जप्त केले आहेत. तर हा व्यक्ती सापांची तस्करी करत असल्याची गुप्त माहिती मुंबई झोनल युनिटच्या महसूल गुप्तचर संचालनालय अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी या व्यक्तीला विमानतळावर रोखून ही कारवाई केली.



दरम्यान, हे सर्व 11 साप विदेशी प्रजातीचे असल्याची माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली आहे. या व्यक्तीने हे साप कोणाला देण्यासाठी आणले होते? तसेच तो या सापांचा काय उपयोग करणार होता? याशिवाय, राज्यात सापांची तस्करी करणारे नेटवर्क तयार झाले आहे की काय? यांसारखे अनेक प्रश्न सध्या उपस्थित झाले आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा छडा लावण्याचे आव्हान महसूल गुप्तचर संचालनालयाच्या  अधिकाऱ्यांसमोर असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *