साक्षी मलिकने केली कुस्ती सोडण्याची घोषणा

दिल्ली, 21 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने आज कुस्ती सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. संजय सिंग यांची गुरुवारी भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) नवीन अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यामुळे साक्षी मलिकने कुस्तीतून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, संजय सिंग हे भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय आहेत. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात 6 महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाची तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे साक्षी मलिकने कुस्ती सोडण्याचा निर्णय घेतला.

https://twitter.com/SakshiMalik/status/1737803756069167542?s=19

यासंदर्भात त्यांनी आज दिल्ली येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया देखील उपस्थित होते. साक्षी मलिकने आपण यापुढे कुस्तीत भाग घेणार नसल्याचे म्हटले आहे. यावेळी साक्षीच्या डोळ्यात अश्रू आले होते. “आम्ही महिला अध्यक्षाची मागणी केली होती. महिला अध्यक्ष असेल तर अशाप्रकारचे छळ होणार नाहीत. आज यादी पाहिली तर एकाही महिलेला हे पद देण्यात आलेले नाही. आम्ही सर्व शक्तीनिशी लढलो, पण हा लढा सुरूच राहणार आहे. नव्या पिढीतील पैलवानांना लढावे लागणार आहे. आम्ही मनापासून लढलो पण जेव्हा ब्रिजभूषण सारखा माणूस त्याचा व्यावसायिक भागीदार आणि जवळचा सहकारी भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) अध्यक्षपदी निवडला जातो, तेंव्हाच मी कुस्ती सोडली. आपण यापुढे कुस्तीत भाग घेणार नाही,” असे साक्षी मलिक यावेळी म्हणाली.

दरम्यान, भारतीय कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात 6 महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केला आहे. हे प्रकरण सध्या कोर्टात प्रलंबित आहे. त्यानंतर ब्रिजभूषण शरण सिंह यांना त्यांच्या पदावरून हटवण्याची मागणी करत विनेश फोगट, बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि संगीता फोगट यांच्यासह देशातील अव्वल कुस्तीपटूंनी निदर्शने केली होती. वाढता विरोध लक्षात घेता, त्यावेळी ब्रिजभूषण शरण सिंह यांनी भारतीय कुस्ती महासंघाची समिती बरखास्त केली होती. कोर्टाच्या हस्तक्षेपानंतर भारतीय कुस्ती महासंघाच्या नव्याने निवडणुका झाल्या. या निवडणुकीत संजय सिंग यांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे या कुस्तीपटूंनी नाराजी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *