सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्यासह एकूण 49 खासदार निलंबित

नवी दिल्ली, 19 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) संसदेचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनात आजच्या दिवशी लोकसभेच्या विरोधी पक्षातील 49 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबन झालेल्या खासदारांमध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, मोहम्मद फैजल, काँग्रेस खासदार शशी थरूर, सपा खासदार डिंपल यादव यांच्यासह 49 खासदारांचा समावेश आहे. त्यामुळे आतापर्यंत संसदेच्या दोन्ही सभागृहातील मिळून 141 खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे.

https://twitter.com/ani_digital/status/1737019448333083032?s=19

यामध्ये लोकसभेतील 95 आणि राज्यसभेतील 46 खासदार आहेत. तत्पूर्वी, कालच्या दिवशी संसदेच्या एकूण 78 खासदारांना निलंबित करण्यात आले होते. यामध्ये लोकसभेच्या 33 आणि राज्यसभेच्या 45 खासदारांचा समावेश होता. देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एकाच दिवसात इतक्या खासदारांचे निलंबन झाले होते. तर गेल्या आठवड्यात देखील 14 खासदारांना निलंबित करण्यात आले होते. या कारवाईमुळे हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत ह्या सर्व खासदारांना लोकसभा आणि राज्यसभेच्या सभागृहात जाता येणार नाही.



तत्पूर्वी, काही दिवसांपूर्वी दोन अज्ञात तरूणांनी संसदेच्या सभागृहात घुसखोरी केली होती. याच मुद्द्यावरून विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेत गदारोळ घातला. संसदेच्या सुरक्षेतील त्रुटीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहात उत्तर द्यावे, अशी मागणी विरोधकांनी केली होती. याबाबत विरोधी पक्षातील खासदार आक्रमक झाले होते. या कारणामुळे ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.



दरम्यान, 13 डिसेंबर रोजी संसदेचे कामकाज सुरू असताना संसदेत 2 अज्ञात तरूण घुसले होते. त्यावेळी त्यांनी सभागृहात काहीतरी वस्तू फेकली, त्यातून पिवळ्या रंगाचा धूर निघत होता. त्यानंतर या दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली होती. त्याचवेळी संसदेच्या परिसरात अन्य दोघांनी स्मोक कँडल घेऊन आंदोलन केले. त्यांना देखील पोलिसांनी अटक केली होती. याप्रकरणात आतापर्यंत 6 जणांना अटक झाली आहे. त्यांना कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *