दुबई, 19 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) आयपीएल 2024 साठी आज मिनी लिलाव होणार आहे. हा लिलाव दुबईत पार पडणार आहे. विशेष म्हणजे, आयपीएलचा लिलाव प्रथमच भारताबाहेर होणार आहे. या मिनी लिलावात 333 क्रिकेटपटूंनी आपले नाव नोंदवले आहे. यामध्ये 214 भारतीय आणि 119 विदेशी क्रिकेटपटूंचा समावेश आहे. तसेच यामध्ये 333 पैकी 116 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले खेळाडू आहेत, तर 215 आंतरराष्ट्रीय सामने न खेळलेले खेळाडू आहेत. या लिलावात 10 संघांमध्ये यापैकी 77 खेळाडूंचीच जागा शिल्लक आहे. त्यामुळे या लिलावात कोणत्या खेळाडूला सर्वात मोठी बोली लागणार? याकडे सर्व क्रिकेटरसिकांचे लक्ष लागले आहे.
या लिलावापूर्वी गुजरात टायटन्स संघाने हार्दिक पांड्याला ट्रेड विंडोच्या माध्यमातून मुंबई इंडियन्सला दिले होते. त्यामुळे आजच्या लिलावात गुजरात टायटन्सकडे सर्वाधिक पैसा असणार आहे. त्यांच्याकडे 38.15 कोटी इतके रुपये शिल्लक आहेत. त्यापाठोपाठ सनरायझर्स हैदराबादकडे 34 कोटी, कोलकाता नाईट रायडर्स 32.7 कोटी, चेन्नई सुपरकिंग्स 31.4 कोटी, पंजाब किंग्ज 29.1 कोटी, दिल्ली कॅपिटल्स 28.95 कोटी, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर 23.25 कोटी, मुंबई इंडियन्स 17.75 कोटी, राजस्थान रॉयल्स 14.5 कोटी आणि लखनौ सुपर जायंट्सकडे 13.15 कोटी रुपये शिल्लक आहे. या लिलावात लखनौ सुपर जायंट्स संघाकडे सर्वात कमी पैसा आहे. तर आजच्या लिलावात 77 खेळाडूंना खरेदी करण्यासाठी सर्व फ्रँचायझींकडे एकूण 262.95 कोटी रुपये शिल्लक आहेत.
https://twitter.com/IPL/status/1736796122834772238?s=19
दरम्यान, या लिलावातून अनेक स्टार खेळाडूंनी माघार घेतली आहे. यामध्ये इंग्लंडचा बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, जो रूट, बांगलादेशचा शकीब अल हसन, केदार जाधव या खेळाडूंनी माघार घेतली आहे. त्यामुळे हे सर्व खेळाडू आपल्याला आयपीएल 2024 मध्ये खेळताना दिसणार नाहीत.
हा लिलाव दुबईतील कोका-कोला एरिना येथे आयोजित करण्यात आला आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 1.00 वाजता या लिलाव प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. यावेळी लिलाव करण्याची जबाबदारी मल्लिका सागर यांच्याकडे देण्यात आली आहे. आयपीएलच्या 16 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादी महिला आयपीएलचा लिलाव करणार आहे. मल्लिका यांनी यापूर्वी महिला प्रीमियर लीगचा लिलावही केला आहे. तुम्ही हा लिलाव स्टार स्पोर्ट्सच्या चॅनलवर पाहू शकता. सोबतच तुम्हाला हा लिलाव जिओ सिनेमा या मोबाईल ॲपवर लाईव्ह पाहता येणार आहे.