अभ्याः काय संभ्या, आज आरटीओ ऑफिसमंदी?
संभ्याः काय न्हाय रं! मित्राची ओव्हरलोड गाडी पकडलीय, म्हणून मी आलोय!
अभ्याः मग, भेटलास की न्हाय साहेबांना?
संभ्याः न्हाय, न्हाय.. महादेवाच्या आगोदर इथं नंदीला भेटावं लागतंय!
अभ्याः म्हंजी, मला न्हाय समजलं?
संभ्याः मग, तू कशाला पत्रकार झालाय? नंदीला प्रसाद व्हायल्याशिवाय महादेव प्रसन्न होत न्हाय! एवढं भी कळत न्हाय का तुला?
अभ्याः अरं एवढा पण मुर्ख न्हाय मी? इथं तर नंदीची लाईनच लागलीय! नंदीच्या गऱ्हाड्यात महादेव आडकलाय!
संभ्याः तसं न्हाय! तुझा नव्हस किती मोठा? यावरून तू कुणच्या नंदीला भेटणार? हे तर ठरलंच हाय!
अभ्याः छोट्या-मोठ्या नंदींबद्दल आधी सांग मला!
संभ्याः हे छोटे-मोठे नंदी छोटी-मोठी कामं करत्यात! गाड्यांचे हस्तांतर, सीएनजी, पासिंग, लायसन, ड्रायव्हिंग स्कूल या बाबतची छोटी-मोठी कामं करत्यात. गावडे, आटोळे, कारंडे, मुंडे, पाटील, शेलार, झगडे, सय्यद, सुळे आदी हे छोटे नंदी हायती. फुलं- नारळावर जगत्यात.
अभ्याः अन् मोठे नंदी? ती कोण-कोण हायती? ती कोण-कोणती कामं करत्यात?
संभ्याः एमआयडीसीमधलं ट्रान्सपोर्ट, एमआयडीसीतलं पार्किंग, ओव्हरलोडींग गाड्या, ट्रान्सपोर्टच्या गाड्या, कार्यालयीन आर्थिक व्यवहार, राजकीय आर्थिक व्यवहार, देवाण-घेवाण, आदी सगळी कामं मोठे- मोठे नंदी करत्यात.
अभ्याः ती कसं बरं?
संभ्याः बारामती- इंदापूर- दौंड या परीवाहन क्षेत्रात 4800 मालवाहतूक करणाऱ्या गाड्या हायती! ह्या सगळ्या गाड्या ओव्हरलोडींगच्या हायती! जे गुप्त डायरीत लिहलेल्या अन् कोड नंबर वरती चालत्यात! ह्या गाड्यांना महिन्याला 3000 रुपयांचं एक कार्ड दिलं जातं. या कार्डवर ही गाडी आरटीओ विभागानं कुठंही पकाडली तर सांकेतिक क्रमांकावरून ज्या गाड्यांची यादी तपासली जात्यात अन् गाडी सोडून देत्यात.
अभ्याः म्हंजी प्रत्येक गाडीला महिन्याला 3000 तर 4800*3000= 14400000 (1 कोटी 44 लाख) नुसतं महिन्याला मालवाहतूक करणाऱ्या ओव्हरलोडच्या गाड्यांकडनं मिळत्यात!
संभ्याः त्यात 1500 ट्रान्सपोर्टच्या गाड्या धर की!
अभ्याः म्हंजी 1500*3000= 4500000 (45 लाख)!
संभ्याः ही चिरी-मिरी हाय बरं का!
अभ्याः एवढं सगळं पैसे गोळा करत्यात! या पैशांचं काय करत्यात?
संभ्याः काय करत्यात म्हंजी? अरं आमच्याकडं एक वाहन निरीक्षक होता, त्यानं चार-पाच वर्षातच बारामतीत एक थार गाडी घेतली, रुई-झारगडवाडी इथं बायको-पोरीच्या नावावर जामीन घेतली, बारामती एमआयडीसी परिसरात मुलीच्या नावानं व्यवसायिक दोन गाळं पण घेतल्यात. एवढा पैसा गुंतवला जातो.
अभ्याः अरं पण ह्यो पैसा गोळा कोण करतं?
संभ्याः मोठे- मोठे नंदी! चौफुल्याचं मगर साहेब, बारामतीचं तनपुरे अन् गंगावणे साहेब हे सगळे पैशांची कामं बघत्यात.
अभ्याः मग, ह्यांना कमिशन मिळत असत्याल की?
संभ्याः प्रत्येक कार्ड पाठीमागं 500 रुपये!
अभ्याः बाबो… 2400000 (24 लाख) रुपये महिन्याचं कमिशन!
संभ्याः अरं ही झालं ठळक वैशिष्टं!
अभ्याः मग, किरकोळ वैशिष्टं काय- काय हायती?
संभ्याः ती तुला नंतर सांगेन.
अभ्याः थोडक्यात काय, तर मेन आरटीओला महिन्याला 1 कोटीचा डल्ला मिळतोय! वाहन निरीक्षकाला त्याच्या निम्मं मिळतोय, शिपाई- कारकुन अन् दलाल टक्केवारीत येत्यात!
संभ्याः म्हंजी काय, अख्खं आरटीओ ऑफिस भ्रष्टाचारी हाय, असं म्हणायचं काय तुला?
अभ्याः न्हाय.. न्हाय..
संभ्याः अरं बदलीसाठी वेगळं पैसं द्यावं लागत्यात, कमईच्या पोस्टसाठी वेगळं पैसं द्यावं लागत्यात, प्रत्येकाचं कमिशन हे ठरल्यालं असतं, राजकारण्याचं टार्गेट असत्यात, अन् एवढ्यातून पण उरलं तर, काय थोडं फार शिल्लक राहत्यात! तेवढंच आपलं लेकरं-बाळांच्या तोंडात! महागाई किती झाली! किती दबाव! त्यात शुगर, ब्लड-प्रेशनर, दवाखानं महाग लागत्यात, दवाखान्यातला खर्च निराळाच! मग किती शिल्लक राहत असत्याल तू बघ, बाबा! कामांची बिलं मिळत न्हाय, पेट्रोलची बिलं मिळत न्हाय, डिझेलची बिलं मिळत न्हाय, स्टेशनरीचा खर्च वेगळाच! ऑफिसचा चहा- पाणी आम्हालाच बघावा लागतो! मग काय शिल्लक राहणार?
अभ्याः काय न्हाय…, काय न्हाय…, काहीच शिल्लक राहत नसंल!
संभ्याः हागलं अन् पोट गेलं एकचं!