ठाणे, 16 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) ठाण्यातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. ठाण्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मुलाने आपल्या 26 वर्षीय प्रेयसीच्या अंगावर कार चालवून तिला जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना 11 डिसेंबर रोजी घडली आहे. याबाबतची माहिती प्रिया सिंग या पीडित तरूणीने सोशल मीडियावरून दिली आहे. याप्रकरणी तिघांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अश्वजित गायकवाड असे या प्रियकराचे नाव आहे. त्याने त्याच्या मित्रांच्या मदतीने हा हल्ला केल्याचा आरोप या तरूणीने केला आहे. ठाणे जिल्ह्यातील घोडबंदर भागातील ओवळा रोडवर ही घटना घडली.
https://www.instagram.com/p/C01Dj5fJXtR/?igshid=MzRlODBiNWFlZA==
पीडित तरूणीची सोशल मीडियावरून माहिती
“माझे अश्वजित गायकवाड सोबत साडेचार वर्षांचे प्रेमसंबंध होते, अशी माहिती प्रिया सिंगने सोशल मीडियावरून दिली आहे. “तसेच आम्ही पूर्णपणे एकमेकांच्या प्रेमात होतो. त्याचे लग्न झाले आहे हे मला आधी माहीत नव्हते. जेव्हा मला याबाबत कळले तेव्हा त्याने मला सांगितले की, त्याची पत्नी आणि तो आता एकत्र राहत नाहीत. मात्र त्या रात्री मी त्याला भेटायला गेले तेव्हा तो त्याच्या पत्नीसोबत होता. त्याच्याशी बोलायला गेल्यावर मला धक्काच बसला. तो माझ्यावर भयंकर चिडला. तेंव्हा आमच्यात मारामारी झाली.” असे या तरूणीने म्हटले आहे.
https://x.com/ANI/status/1735972700148146580?s=20
त्याने ड्रायव्हरला अंगावर कार घालायला लावली
“त्यानंतर मी आपला फोन आणि बॅग घेण्यासाठी अश्वजितच्या कारकडे धाव घेतली असता त्याने चालकाला माझ्या अंगावर गाडी घालण्यास सांगितले. कारचे मागील डावे चाक माझ्या उजव्या पायावरून गेले. माझ्या पायावरुन गाडी घातल्यानंतर ते पळून गेले. रस्त्याने जाणार्या एका व्यक्तीने मला पाहिले आणि स्थानिक पोलिसांना माहिती दिली. हा अनोळखी व्यक्ती मला मदत करण्यासाठी माझ्या जवळच राहिला. काही वेळाने माझ्या बॉयफ्रेंडचा ड्रायव्हर मी मेली आहे की जिवंत हे तपासण्यासाठी परत आला. असे ती म्हणाली.
पोलिसांना या प्रकरणात आणू नको!
त्याने अज्ञात व्यक्तीला पाहिल्यानंतर पोलीस कारवाई टाळण्यासाठी मला गाडीतून रुग्णालयात नेले. त्यानंतर या चालकाने याप्रकरणात पोलिसांना गुंतवू नको, तुला याचे कारण किती चांगले माहित आहे, असे सांगून मला धमकी देण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यामुळे माझा उजवा पाय तुटला आहे आणि मला शस्त्रक्रिया करावी लागली, उजव्या पायात रॉड घालावा लागला. माझ्या संपूर्ण शरीरावर जखमा आहेत, माझ्या हातावर, माझ्या पाठीवर आणि माझ्या पोटात खोलवर जखमा आहेत. मी किमान 3-4 महिने अंथरुणाला खिळून राहीन आणि त्यानंतर मला अजून 6 महिने चालण्यासाठी आधार घ्यावा लागेल. मी माझ्या कुटुंबातील मुख्य कमावती सदस्य आहे, असे या पीडित तरूणीने तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
https://x.com/ANI/status/1735979487630922009?s=20
माझ्या बहिणीला धमक्या दिल्या जात आहेत
हा प्रकार ज्या दिवशी घडला, त्याच दिवशी मी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यासाठी गेले होते. त्यानंतर याप्रकरणी कोणतीही कारवाई झाली नाही. मात्र, आज जेव्हा मी सोशल मीडियावर पोस्ट केली. तेंव्हा पोलिसांनी मला प्रतिसाद दिला असल्याचे या तरूणीने म्हटले आहे. तसेच अश्वजित गायकवाडचे काही मित्र 2 दिवसांपासून सतत दवाखान्यात येत आहेत. मी एफआयआर दाखल केल्यामुळे ते माझ्या बहिणीला धमक्या देत आहेत, असा आरोप प्रिया सिंग या पीडित तरूणीने केला आहे.
https://x.com/ANI/status/1735985310847369455?s=20
कलम 307 नुसार गुन्हा दाखल करावा – वकील
याप्रकरणी, पोलिसांनी तिचा जबाब नोंदवला आहे. त्यानुसार पुढील कारवाई करत तीन आरोपींविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर याबाबत प्रिया सिंगच्या वकील दर्शना पवार म्हणाल्या की, “मी सकाळी प्रियाला भेटले तिची प्रकृती स्थिर आहे पण जखमा खूपच गंभीर आहेत. आयपीसी कलम 307 नुसार दुखापतींची नोंद व्हायला हवी होती, जी नोंद झालेली नाही. आम्ही तपास अधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांना कलम 307 आणि कलम 356 नुसार गुन्हा दाखल करण्याची विनंती करत आहोत. परंतु, पोलिसांनी आजपर्यंत आमची विनंती मान्य केली नाही. या घटनेला चार दिवसांहून अधिक काळ लोटला आहे. पोलिसांनी न्याय दिला नाहीतर आम्हाला उच्च न्यायालयात जावे लागेल.” त्यामुळे याप्रकरणात आरोपींना अटक होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.