मुंबई, 15 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) आयपीएलच्या पुढच्या हंगामासाठी सर्वच संघ सध्या तयारी करताना दिसत आहेत. तसेच आयपीएलमधील खेळाडूंचा लिलाव येत्या 19 डिसेंबर रोजी होणार आहे. अशातच मुंबई इंडियन्स संघाने मोठी घोषणा केली आहे. मुंबई इंडियन्सने संघाच्या कर्णधारपदी हार्दिक पांड्याची निवड केली आहे. त्यामुळे रोहित शर्माचा मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाचा कार्यकाळ आता समाप्त झाला आहे. यासंदर्भात मुंबई इंडियन्सने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. यामधून ही माहिती देण्यात आली आहे. तर काही दिवसांपूर्वीच हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सने आपल्या संघात सहभागी करून घेतले होते. त्याआधी तो गुजरात टायटन्सचा कर्णधार होता.
https://twitter.com/mipaltan/status/1735641344520159526?s=19
भविष्यातील रणनीती लक्षात घेऊन हार्दिक पांड्याला कर्णधार करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुंबई इंडियन्सचे ग्लोबल हेड ऑफ परफॉर्मन्स महेला जयवर्धने यांनी म्हटले आहे. “मुंबई इंडियन्स संघ त्याच्या वारसा उभारणीसाठी आणि दूरदर्शी दृष्टिकोनासाठी ओळखला जातो. सचिनपासून ते हरभजनपर्यंत आणि रिकीपासून ते रोहितपर्यंत मुंबई इंडियन्सला नेहमीच अपवादात्मक नेतृत्व लाभले आहे. तात्काळ यश मिळवण्याबरोबरच भविष्यासाठी संघाला बळकट करण्यात योगदान देण्याकडे देखील त्यांचे लक्ष असते. या विचारसरणीनुसार हार्दिक पांड्या आयपीएल 2024 साठी मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद स्वीकारणार आहे. मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याचे आम्ही स्वागत करतो आणि त्याला खूप खूप शुभेच्छा देतो.” असे महेला जयवर्धने म्हणाले आहेत.
https://twitter.com/mipaltan/status/1735643112159031604?s=19
याबरोबरच महेला जयवर्धनेने मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा याचे आभार मानले आहेत. “रोहित शर्माचा 2013 पासून आतापर्यंतचा कार्यकाळ असाधारण राहिला आहे. रोहितच्या कर्णधारपदाने संघाला केवळ अतुलनीय यश मिळवून दिले नाही तर आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक म्हणून त्याचे स्थान पक्के केले आहे. मुंबई इंडियन्सला आणखी मजबूत करण्यासाठी मैदानावर आणि मैदानाबाहेर रोहित शर्माच्या मार्गदर्शन आणि अनुभवाची आम्हाला अपेक्षा आहे.”
https://twitter.com/mipaltan/status/1735647575552770379?s=19
दरम्यान, रोहित शर्माला मुंबई इंडियन्सचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हटले जाते. रोहित शर्माने 2013 पासून मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद भूषवले होते. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना मुंबई इंडियन्सने चांगली कामगिरी केली होती. त्याच्या कर्णधारपदाच्या काळात मुंबईने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 या साली 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते.