महेंद्रसिंग धोनीची 7 नंबरची जर्सी निवृत्त

दिल्ली, 15 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याची 7 क्रमांकाची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील माहिती बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिली आहे. त्यामुळे महेंद्रसिंग धोनीची 7 नंबरची जर्सी निवृत्त झाल्याने यापुढे इतर कोणत्याही भारतीय खेळाडूला 7 नंबरची जर्सी घालता येणार नाही. यावेळी राजीव शुक्ला म्हणाले की, “बीसीसीआयने हा निर्णय एमएसच्या योगदानाला लक्षात घेऊन घेतला आहे. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनी हा त्याच्यासाठी सन्मान आहे. जर्सी नंबर 7 ही एमएस धोनीची ओळख होती आणि या ब्रँडचा कोणी उपयोग करू नये म्हणून बीसीसीआयने उचललेले हे पाऊल कौतुकास्पद आहे.”

https://twitter.com/ANI/status/1735586111471439966?s=19


तर असा सन्मान मिळवणारा धोनी हा दुसरा क्रिकेटपटू ठरला आहे. यापूर्वी, बीसीसीआयने 2017 मध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची 10 नंबर असलेली जर्सी कायमस्वरूपी निवृत्त केली होती. राष्ट्रीय संघात पदार्पण करणाऱ्या युवा खेळाडूंना सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या जर्सीच्या क्रमांकाचा पर्याय उपलब्ध नसल्याचे बीसीसीआयच्या वतीने सांगण्यात आले आहे, असे इंडियन एक्सप्रेसने त्यांच्या बातमीत म्हटले आहे. बीसीसीआयने महेंद्रसिंग धोनीचे खेळातील योगदान लक्षात घेऊन त्याची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे.



त्यांच्या या निर्णयामुळे नवीन खेळाडूंना आता 7 नंबरची जर्सी आणि 10 नंबरची जर्सी मिळणार नाही. दरम्यान, महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर 3 वर्षांनी बीसीसीआयने धोनीची 7 नंबरची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे. धोनीसाठी हा एक मोठा सन्मान असणार आहे.

महेंद्रसिंग धोनीच्या कर्णधारपदाच्या काळात भारतीय संघाने 2007 मध्ये पहिला टी-20 विश्वचषक जिंकला होता. तसेच 2011 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. यासोबतच 2013 च्या आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी ही स्पर्धा देखील भारतीय क्रिकेट संघाने जिंकली होती. याशिवाय, धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने अनेक मालिकांमध्ये विजय मिळवला होता. त्यामुळे धोनीचे नाव भारतातील सर्वोत्कृष्ट कर्णधारांमध्ये घेतले जाते. धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्त झाला असला तरी सध्या तो आयपीएलमध्ये खेळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *