संसदेच्या सुरक्षेत भंग; 8 सुरक्षा कर्मचारी निलंबित

नवी दिल्ली, 14 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याप्रकरणी 8 सुरक्षा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई लोकसभा सचिवालयाने केली आहे. दरम्यान, संसदेच्या हिवाळी अधिवेशनात कालच्या दिवशी लोकसभेचे कामकाज सुरू असताना 2 अज्ञात व्यक्ती संसदेत घुसले होते. यावेळी त्या दोघांनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उड्या घेतल्या. त्यानंतर या व्यक्तींनी काहीतरी फेकले, यातून पिवळा धूर बाहेर पडत होता. या घटनेमुळे संसदेत एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर काही खासदार आणि सुरक्षा रक्षक यांनी मिळून या दोघांना पकडून त्यांना बाहेर काढले. त्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. सागर शर्मा आणि मनोरंजन डी असे त्यांची नावे आहेत. या घटनेनंतर सभागृहाचे कामकाज काही वेळ स्थगित करण्यात आले होते. तर या घटनेचा तपास सध्या दिल्ली पोलीस करीत आहेत.

https://twitter.com/ani_digital/status/1735182934494064917?s=19

त्याचवेळी सभागृहाच्या बाहेर कलर स्मोक घेऊन आंदोलन करणाऱ्या आणखी दोघांना देखील पोलिसांनी अटक केली आहे. अमोल शिंदे आणि निलम सिंह असे अटक केलेल्यांची नावे आहेत. अमोल शिंदे हा 25 वर्षीय तरूण असून तो लातूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. तर 42 वर्षीय निलम नावाची ही महिला हरियाणा राज्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या घटनेनंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

https://x.com/ANI/status/1734842655962693883?s=20


लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, “काल सभागृहात जे काही घडले त्याबद्दल आपण सर्वजण चिंतित आहोत. सभागृहाची सुरक्षा ही लोकसभा सचिवालयाची जबाबदारी आहे.” तसेच काँग्रेस खासदार मणिकम टागोर यावेळी म्हणाले की, “हे गुप्तचर यंत्रणेचे अपयश आहे आणि आम्हाला या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासाची अपेक्षा आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर दिले पाहिजे.” या पार्श्वभूमीवर संसदेतील घुसखोरी संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज संसदेत निवेदन देण्याची शक्यता आहे.

https://x.com/ANI/status/1734851343754690670?s=20

दरम्यान, संसदेत अज्ञात व्यक्तींनी घुसखोरी केल्याच्या पार्श्वभूमीवर, आज संसदेच्या सुरक्षेत आमूलाग्र बदल दिसून आला. यावेळी बाहेरील गेटच्या प्रवेशद्वारावर तैनात असलेले सुरक्षा कर्मचारी कॅम्पसच्या आवारात प्रवेश करणार्‍यांची कसून तपासणी करत आहेत. तसेच ते त्यांना बुट काढायला लावत आहेत. ही नवीन सुरक्षा व्यवस्था विमानतळासारखीच असल्याचे दिसत आहे. याशिवाय मकरद्वार येथून संसद भवनात फक्त खासदारांनाच प्रवेश दिला जात असून इमारतीत प्रवेश करणाऱ्या सर्वांची कसून तपासणी केली जात आहे. सोबतच सुरक्षा कर्मचार्‍यांनी प्रसारमाध्यमांना नवीन संसद भवनाच्या मकरद्वार पासून सुमारे 50-60 मीटर अंतरावर उभे राहण्यासाठी निर्बंध लागू केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *