राज्यातील सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर

मुंबई, 14 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्यातील सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. या संपामध्ये राज्यातील विविध सरकारी विभागातील 17 लाख कर्मचारी सहभागी होणार आहेत. तत्पूर्वी, जुनी पेन्शन लागू करावी या मागणीसाठी राज्य शासन आणि सरकारी कर्मचारी संघटना यांच्यात एक बैठक झाली. मात्र, यासंदर्भात सदर बैठकीत कोणताच तोडगा निघाला नाही. त्यामुळे राज्य सरकारी कर्मचारी त्यांच्या या संपावर ठाम आहेत. या संपाचा फटका राज्यातील जनतेला बसणार आहे. कारण, या संपामुळे अनेक प्रकारची सरकारी कामे खोळंबण्याची शक्यता आहे.



दरम्यान, महाराष्ट्रात 2005 नंतर नोकरीत रुजू झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. तर राज्य सरकारने हा निर्णय मागे घेऊन 1982 च्या आदेशानुसार राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. याच मागणीसाठी गेल्या मार्च महिन्यात राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने बेमुदत संप पुकारला होता. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात आवाहन केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी हा संप मागे घेतला होता. त्यानंतर राज्य सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत कोणतीच भूमिका घेतली नसल्याने सरकारी कर्मचाऱ्यांनी आता पुन्हा एकदा संपाचे हत्यार उपसले आहे.

या संपात राज्य सरकारी कर्मचारी, निम सरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी याशिवाय सरकारी रुग्णालयातील कर्मचारी, महानगरपालिका कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी यांच्यासह अनेक सरकारी कार्यालयातील कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत. या संपामुळे राज्यातील सरकारी कार्यालयातील कामकाज ठप्प राहणार आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *