मुंबई, 12 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) नवजात बालिकेला रुग्णालयातील शौचालयाच्या कचरा कुंडीत फेकल्याप्रकरणी एका 23 वर्षीय महिलेला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईतील सायन रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला होता. सायन रुग्णालयाच्या शौचालयाच्या कचऱ्यात एका नवजात बालिकेचा मृतदेह आढळून आला होता. 8 डिसेंबर रोजी ही घटना घडली होती. त्यावेळी रुग्णालयातील डॉक्टरांनी तातडीने या नवजात बालिकेची तपासणी केली होती. त्यावेळी तिला मृत घोषित करण्यात आले होते.
https://x.com/ANI/status/1734478893481144702?s=20
याप्रकरणी, पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला होता. आता या प्रकरणात एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी या महिलेला धारावी परिसरातून ताब्यात घेतले. यासंदर्भात पोलिसांनी तिची चौकशी केली असता, या महिलेने आपला गुन्हा कबूल केला आहे.
तत्पूर्वी, रुग्णालयात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही महिला शौचालयाजवळ भटकताना दिसत होती. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी या महिलेला मुंबईतील धारावी परिसरातून अटक केली. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेला लग्न न करता मुलगी झाली होती. लग्नाच्या आधी आई झाल्यामुळे समाजापासून ही वस्तुस्थिती लपवण्यासाठी तिने हे पाऊल उचलल्याचे या महिलेने सांगितले आहे. तर या घटनेचा सध्या पोलीस अधिक तपास करीत आहेत.