सरकारी रुग्णालयांमधील मृत्यूंविरोधात विरोधी पक्षांची निदर्शने

नागपूर, 12 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्यातील सरकारी आरोग्य व्यवस्था ढासळत चालली आहे. या पार्श्वभूमीवर, महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. यावेळी त्यांनी राज्य सरकारी रुग्णालयांमध्ये झालेल्या मृत्यूंबद्दल राज्य सरकार आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा निषेध केला. जनतेचे आरोग्य खराब करणाऱ्या सरकारचा आज स्टेथोस्कोप घेऊन तपासणी करण्याची वेळ आली आहे अशी भूमिका यावेळी महाविकास आघाडीच्या आमदारांनी घेतली.



या आंदोलनादरम्यान ह्या नेत्यांनी “नाही औषध नाही गोळी, आरोग्य व्यवस्थेची झाली होळी, राज्याची आरोग्य व्यवस्था खिळखिळी रोज जातोय गरीब निष्पाप रुग्णांचा बळी” यांसारख्या घोषणांचे फलक घेऊन राज्य सरकारचा निषेध केला. या आंदोलनात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेस नेते सतेज पाटील, बाळासाहेब थोरात यांसारखे अनेक नेते सहभागी झाले होते.

https://twitter.com/iambadasdanve/status/1734480421919084971?s=19

गेल्या 6 महिन्यांत चंद्रपुर जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात तब्बल 436 मृत्यू झाले आहेत. तसेच नांदेड जिल्ह्यात 24 मृत्यू, ठाणे कळवा 24 मृत्यू आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्य सरकारला प्रश्न विचारत त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.

https://twitter.com/iambadasdanve/status/1734529152383144081?s=19


याबाबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, “नांदेड, नागपूर, कळवा येथे अपुऱ्या औषध पुरवठा अभावी आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे की काय अशी अवस्था आहे. आरोग्य व्यवस्था सुधारण्या ऐवजी बिघडत चालली आहे. सरकारच्या घोषणा फोल ठरत आहेत. क्षमतेच्या तुलनेत आरोग्य विभागात पदे रिक्त आहेत. जिल्हा रुग्णालयात मोठया प्रमाणात औषधांचा तुटवडा आहे.”

तसेच “हाफकीन असेल किंवा नव्याने स्थापन केलेले मंडळ असेल कुठेही सरकारने औषधे खरेदी केली नाहीत. नांदेडच्या जिल्हा रुग्णालयात गरोदर महिलेला वेळेवर उपचार मिळाले नाहीत त्यामुळे तिचं बाळ दगावलं. तर तिला 70 हजार रुपयांची औषधे खरेदी बाहेरून करावी लागली. सरकार आरोग्य व्यवस्था चालविण्यास अपयशी ठरलं आहे. शासनाने आरोग्य व्यवस्थेच्या दयनीय स्थितीबाबत खुलासा करावा, अशी मागणी अंबादास दानवे यांनी आज सभागृहात केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *