पंतप्रधान मोदींविषयी आक्षेपार्ह लिखाण; संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल

यवतमाळ, 12 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सामना वृत्तपत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण केल्याच्या आरोपावरून संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी भारतीय जनता पार्टी यवतमाळचे समन्वयक नितीन भुतडा यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार सामना वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 153 (ए), 505 (2) आणि कलम 124 (ए) अंतर्गत यवतमाळच्या उमरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.



तत्पूर्वी पाच राज्यातील विधानसभा निवडणूकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर संजय राऊत यांनी यासंदर्भात सामना वृत्तपत्रात आपली भूमिका मांडली होती. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. काँग्रेसने या विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेश आणि राजस्थान जिंकले असते तर, 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानशी संगनमत करून एखादा बॉम्ब टाकला असता. त्यामुळे नवे पुलवामा घडताना उघड्या डोळ्यांनी पाहिले असते, असे संजय राऊत यांनी सामना वृत्तपत्राच्या एका लेखात लिहिले होते. याप्रकरणी संजय राऊत यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल झाला आहे.

https://twitter.com/ANI/status/1734462813022847202?s=19

तर गुन्हा दाखल झाल्यानंतर संजय राऊत यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. “आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आदर आहे. अमित शाह यांनी काही दिवसांपूर्वी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंबद्दल टीका केली होती. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल का?” असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. “आमच्या देशात लोकशाही आहे आणि अनेक राजकारणी वक्तव्ये करतात. त्या लोकांवर गुन्हे दाखल करा, नाहीतर मग आणीबाणीच्या विरोधात लढले असे म्हणण्याचा अधिकार त्यांना नाही.” असे संजय राऊत यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *