एनआयएचे 44 ठिकाणी छापे; 13 जणांना अटक

पुणे, 09 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आज इसिस या दहशतवादी संघटनेने रचलेल्या कटाच्या विरोधात देशभरात 44 ठिकाणी एकाच वेळी मोठे छापे टाकले आहेत. या कारवाईत आतापर्यंत 13 जणांना अटक करण्यात आली आहे. एनआयएने त्यांच्याकडून मोबाईल, लॅपटॉप आणि इतर वस्तू जप्त केल्या असल्याचे म्हटले जात आहे. मात्र यासंदर्भात एनआयएने कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. त्यांच्यावर भारतात दहशतवादी संघटना तयार करणे तसेच दहशतवादी हल्ल्याचा कट रचणे आणि देशात दहशतवादी विचारसरणी पसरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. सध्या त्यांची कसून चौकशी केली जात आहे.

https://twitter.com/ANI/status/1733316462427897915?s=19

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आज सकाळी कर्नाटक आणि महाराष्ट्रातील 44 ठिकाणी छापे टाकले होते. यामध्ये ठाणे ग्रामीणमध्ये 31, ठाणे शहरात 9, पुणे 2 आणि भाईंदरमध्ये एका ठिकाणी छापे टाकले आहेत. देशात दहशतवादी हल्ले घडवण्याच्या कट रचल्याप्रकरणी एनआयएकडून ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे एनआयएच्या तपासात इसिसची दहशतवादी विचारसरणी भारतात पसरवणारे नेटवर्क उघडकीस आले आहे.

https://twitter.com/ANI/status/1733325933099245778?s=19

भारतीय भूमीवर दहशतवादी कारवाया करणे हा या संघटनेचा उद्देश होता. या नेटवर्कने इसिसच्या स्वयंघोषित नेत्याशी एकनिष्ठ असल्याची शपथ घेतली होती. तसेच हे नेटवर्क स्फोटकांची उपकरणे देखील तयार करत असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एनआयए सतर्क झाली आहे. याआधी एनआयएच्या पथकाने गेल्या आठवड्यात जम्मू-काश्मीर खोऱ्यातील 5 जिल्ह्यांत छापे टाकले होते. तर गेल्या महिन्यात दुसऱ्या कारवाईत इसिसच्या मोठ्या दहशतवादी कारवाईचा पर्दाफाश झाला होता. त्यावेळी अहमदाबाद आणि गांधीनगरमध्ये मोठे स्फोट घडवून आणण्याचा कट एनआयएने उधळून लावला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *