फडणवीसांचे पत्र जनतेला स्पष्टीकरण देण्यासाठी आहे – जयंत पाटील

नागपूर, 08 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक हे काल विधानसभेत आले होते. नवाब मलिक यांना कथित मनी लॉंड्रिंग प्रकरणी सध्या जामीन मिळाला आहे. त्यानंतर त्यांनी काल प्रथमच विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला हजेरी लावली. त्यावेळी नवाब मलिक हे सभागृहात अजित पवार गटाच्या शेजारील बाकावर बसले होते. त्यामुळे नवाब मलिक यांनी अजित पवार गटात प्रवेश केला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल अजित पवार यांना पत्र लिहून नवाब मलिक यांना महायुतीत घेण्यास विरोध केला आहे.


नवाब मलिक यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप झाले आहेत, त्यामुळे त्यांना महायुतीत घेणे योग्य ठरणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रात म्हटले आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी हे पत्र सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. नवाब मलिक यांच्या यासंदर्भात अजित पवारांना पत्र पाठवण्याऐवजी ते त्यांना फोन करून देखील सांगता आले असते, असे जयंत पाटील यावेळी म्हणाले. “तसेच हे पत्र लिहिल्यानंतर फडणवीस यांनी ते सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यामुळे मला वाटते की, हे पत्र अजित पवारांना नाही तर, महाराष्ट्रातील जनतेला स्पष्टीकरण देण्यासाठी आहे,” असे जयंत पाटील म्हणाले आहेत.

https://twitter.com/ANI/status/1732803507248636057?s=19

तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या या पत्राविषयी प्रतिक्रिया दिली आहे. “मला वाटते की नवाब मलिक महायुती सोबत आहेत आणि ते महायुतीचाच भाग आहेत. तर नवाब मलिक यांच्यावरून महायुतीत कोणताही वाद होणार नाही.” असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

https://twitter.com/ANI/status/1732898252083929519?s=19

https://twitter.com/ANI/status/1732993320178401611?s=19

तसेच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या या पत्राच्या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. भाजपने नवाब मलिक यांच्याविषयी चुकीचे केले आहे. नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी ड्रग माफियांविरुद्ध लढा दिला. तसेच नवाब मलिक यांनी भाजपच्या भारत जुमला पार्टीचा पर्दाफाश करण्याचे काम देखील केले आहे. जोपर्यंत ते दोषी सिद्ध होत नाहीत तोपर्यंत प्रत्येकजण निर्दोष आहे. मग भाजप खोटे आरोप कसे करू शकते? मला विश्वास आहे की, कोर्ट नवाब मलिक यांचा योग्य न्याय करेल आणि नवाब मलिक यांना न्याय मिळेल. आम्ही नवाब मलिक आणि त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी पूर्ण ताकदीनिशी उभे आहोत.” अशा सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *