नवाब मलिक यांना महायुतीत घेण्याला देवेंद्र फडणवीस यांचा विरोध

नागपूर, 07 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूरात सुरू होत आहे. या अधिवेशनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक आले होते. नवाब मलिक हे कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात सध्या जामिनावर बाहेर आहेत. त्यानंतर नवाब मलिक यांनी आज प्रथमच विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला हजेरी लावली. यावेळी नवाब मलिक हे सभागृहात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील आमदारांच्या शेजारील रांगेत बसले होते. तसेच त्यांनी यावेळी अजित पवार गटातील अनेक आमदारांची भेट घेतली. सोबतच नवाब मलिक त्यांच्याशी हस्तांदोलन करताना दिसले. त्यामुळे नवाब मलिक हे अजित पवार गटात सहभागी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे.

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1732745851301138722?s=19

दरम्यान, नवाब मलिक यांच्या अजित पवार गटात येण्याने मात्र शिंदे-फडणवीस सरकारमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अजित पवार यांना पत्र लिहून नवाब मलिक यांना महायुतीत घेण्याला विरोध दर्शवला आहे. नवाब मलिक यांच्यावर आरोप होत असून त्यांना महायुतीत सामील करणे योग्य होणार नाही. सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रात म्हटले आहे.



या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य श्री. नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते. विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकार सुद्धा आहे. त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रूता अथवा आकस अजिबात नाही, हे मी प्रारंभीच स्पष्ट करतो. परंतू, ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत, ते पाहता, त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही, असे आमचे मत आहे. सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे. सद्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत.

त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे. मात्र अशाप्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे. आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे, हा सर्वस्वी आपला अधिकार आहे, हे मान्यच आहे. परंतू, त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो, त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे. त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालिन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही. आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल, अशी मला आशा आहे.” असे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रात म्हटले आहे. त्यामुळे नवाब मलिक यांच्याविषयी अजित पवार हे आता कोणती भूमिका घेणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *