पंतप्रधान मोदींनी मिचॉन्ग चक्रीवादळात झालेल्या मृत्यूंबद्दल शोक व्यक्त केला

पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजना

नवी दिल्ली, 06 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि पुद्दुचेरी या राज्यांत सध्या ‘मिचॉन्ग’ चक्रीवादळाने थैमान घातले आहे. हे चक्रीवादळ आणि मुसळधार पावसामुळे या राज्यांत अनेक लोक मृत्युमुखी पडले आहेत. या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. यासंदर्भात त्यांनी आपल्या भावना ट्विट करून व्यक्त केल्या आहेत. केंद्र सरकारचे अधिकारी बाधितांच्या मदतीसाठी काम करीत असल्याचे नरेंद्र मोदी यांनी यावेळी म्हटले आहे.

“माझे विचार त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत ज्यांनी मिचॉन्ग चक्रीवादळामुळे विशेषतः तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि पुद्दुचेरीमध्ये आपले प्रियजन गमावले आहेत. या चक्रीवादळामुळे जखमी किंवा प्रभावित झालेल्या लोकांसोबत माझ्या प्रार्थना आहेत. बाधितांना मदत करण्यासाठी अधिकारी घटनास्थळी अथक प्रयत्न करत आहेत आणि परिस्थिती पूर्णपणे सामान्य होईपर्यंत त्यांचे कार्य सुरू ठेवतील.” असे पंतप्रधान मोदी या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

दरम्यान, मिचॉन्ग या चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हे चक्रीवादळ आणि मुसळधार पाऊस यामुळे तेथील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. सोबतच नद्या, कालवे आणि तलावांना पूर आला आहे. त्यामुळे या राज्यांतील हजारो एकर पिके पाण्याखाली गेली आहेत. याशिवाय, तमिळनाडूच्या चेन्नई आणि आसपासच्या भागात सोमवारी झालेल्या मिचॉन्ग चक्रीवादळामुळे आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर आता चेन्नई आणि आसपासच्या परिसरातील पुरामध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी मिचॉन्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे 5060 कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले आहे. केंद्र सरकारने ही मदत तातडीने द्यावी, असे एमके स्टॅलिन यांनी या पत्रात म्हटले आहे. तसेच मिचॉन्ग चक्रीवादळामुळे राज्यात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक पाठवण्याची विनंतीही त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे. तर हे पत्र द्रमुकचे खासदार टीआर बालू पंतप्रधान मोदींना देणार आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांची मागणी मान्य करतील का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

One Comment on “पंतप्रधान मोदींनी मिचॉन्ग चक्रीवादळात झालेल्या मृत्यूंबद्दल शोक व्यक्त केला”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *