आमच्यावरील गुन्हे तातडीने मागे घ्या – जरांगे पाटील

जालना, 01 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची आज जालना येथे भव्य सभा पार पडली. या सभेला मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरकारने मराठा आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केली आहे. सरकारने आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले नाहीत तर हे सरकार विश्वासघातकी ठरू शकते, असेही जरांगे पाटील यांनी यावेळी म्हटले आहे.

“आमच्या आंतरवालीत आम्ही शांततेत बसलो होतो. शांततेत बसलो असताना अचानकपणे आमच्यावर हल्ला झाला. आमच्या आया-बहिणीचे डोके फोडले. या मराठ्यांसाठी आमच्या पोरांनी छातीवर गोळ्या झेलल्या. आमच्या आया-बहिणी बेशुद्ध पडल्या. ती कोणाच्या तरी घरातली आई होती. ती कोणाची तरी बहीण होती. इतके निष्ठूर पोलीस आणि सरकार असू शकतं हे पहिल्यांदाच बघितलं.” असे ते यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ प्रकरण; ठाकरे गटाच्या नेत्याला जामीन मंजूर

“आम्ही तुम्हाला सहकार्य केलं. तुम्ही म्हणताल ते आम्ही ऐकलं. तुम्ही आम्हाला गुन्हे मागे घेऊ म्हणता आणि आमची लोकं अटक करता? तुम्ही आमच्याशी दगाफटका करता. तुम्ही आम्हाला सरळ सांगा की, तुम्हाला आम्ही अटक करणार आहोत. आम्ही 5 कोटी मराठे जेलमध्ये येऊन बसतो. करा अटक आम्हा सगळ्यांना. राज्य सरकारला माझी विनंती आहे की, आमच्या लोकांवरचे गुन्हे तुम्ही मागे घेतले नाहीत पण आमचे लोकं अटक केले. हा डाव तुम्हीचं रचला. आमचे लोकं तर सुटतीलचं. परंतू, त्यामुळे तूम्ही विश्वासघात्यांच्या यादीत जाऊन बसू शकता”, अशी जरांगे पाटलांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

शरद पवारांच्या राजीनाम्याविषयी अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

“मराठा शांततेत आहेत त्यांना शांततेतच राहू द्या. आमच्या लोकांना का अटक केली? तूम्ही आम्हाला गून्हे मागे घेऊ म्हटले होते, तरी देखील आमच्यावरील गुन्हे मागे का घेतले नाहीत? आमच्यावर हल्ला करणाऱ्या अधिकाऱ्यांना पुन्हा का रुजू केलं? लाठीचार्जचे आदेश कोणी दिले? लाठीचार्ज कसा काय झाला? याचे उत्तर मला लवकरात लवकर पाहिजे. आमच्यावरील गुन्हे तातडीने मागे घ्या आणि आमचे लोकं अटक का केली? याचे उत्तर द्या. 24 डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रातील सगळ्या मराठ्यांना आरक्षण देण्याचा कायदा लागू करण्याचा शब्द तुम्ही दिला आहे. 24 डिसेंबरच्या आत आम्हा मराठ्यांना आरक्षण पाहिजेत, अन्यथा 24 डिसेंबरनंतर जे आंदोलन होईल ते सरकारला जड जाईल”, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे.

One Comment on “आमच्यावरील गुन्हे तातडीने मागे घ्या – जरांगे पाटील”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *