जातीनिहाय जनगणना करण्याची अजित पवारांची मागणी

कर्जत, 01 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे दोन दिवसीय शिबिर पार पडत आहे. या शिबिराचा आजचा दुसरा दिवस आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज या शिबिराला हजेरी लावली. यावेळी अजित पवार यांनी त्यांच्या भाषणातून सध्या गाजत असलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. या सभेत अजित पवारांनी जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी केली आहे.

“प्रत्येकाला आपल्या जाती आणि धर्माचा अभिमान असला पाहिजे. माझी महाराष्ट्रातील सर्वांना विनंती आहे की, आपला हा अभिमान जपत असताना इतर समाजाबद्दल, इतर जातीबद्दल आणि इतर धर्माबद्दल द्वेष हा मनामध्ये ठेऊ नका. याची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. आपल्या बोलण्यातून आणि वर्तवणुकीतून असे प्रकार घडत नाहीत ना, याची काळजी प्रत्येकाने घ्यावी. एखाद्या समाजाचा प्रश्न सोडवत असताना इतरांसोबत अन्याय होणार नाही, याची काळजी सत्ताधारी म्हणून आपल्याला घ्यावीच लागेल.” असे अजित पवारांनी म्हटले आहे.

देवदर्शनासाठी जात असलेल्या 8 भाविकांचा अपघाती मृत्यू

“एखाद्या समाजाचा मागासलेपणा काळानुरूप बदल झाला असल्यास त्याचे मागासलेपण पुन्हा तपासणे आवश्यक आहे. मात्र या कामासाठी वेळ लागतो. हे विशेषतः मराठा समाजातील तरूणांनी ध्यानात ठेवले पाहिजे. एखाद्या समाजाला आरक्षण देताना त्या समाजाचा आरक्षण देताना इम्पेरिकल डेटा आणि त्याचे मागासलेपण सिद्ध होणे अत्यंत गरजेचे असते. म्हणूनच जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. जोपर्यंत प्रत्येक समाजाची नेमकी आकडेवारी समोर येत नाही, तोपर्यंत कोणत्या समाजाला किती आरक्षण द्यावे, याचा नेमका अंदाज येत नाही.” असे अजित पवार यावेळी म्हणाले.

छगन भुजबळ यांना धमकीचे मेसेज; गुन्हा दाखल

“राज्यात सध्या जाती जातींमध्ये भांडणे उभी राहण्याचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राला पुन्हा एकदा महापुरुषांच्या विचाराकडे नेण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगडा जातींना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले आहे. हा आपला महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराजांचा आहे. आज महाराष्ट्रात दोन समाजात तेढ निर्माण होईल, अशी चिथावणीखोर भाषणे केली जात आहेत. हे थांबायला पाहिजे. यातून दंगली घडल्या तर याला जबाबदार कोण? महाराष्ट्रात राजकारणासाठी कोणी जाती जातींमध्ये भांडणे लावून कोणी दंगली घडवून आणत असतील तर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि हा अजित पवार हे होऊन देणार नाही. भले त्यासाठी काहीही मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल.” असे अजित पवार यांनी यावेळी म्हटले आहे.

One Comment on “जातीनिहाय जनगणना करण्याची अजित पवारांची मागणी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *