तिरुवनंतपुरम, 26 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज टी-20 मालिकेतील दुसरा सामना झाला या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 44 धावांनी विजय मिळवला आहे. तिरुवनंतपुरम येथील मैदानावर झालेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करीत ऑस्ट्रेलियासमोर 236 धावांचे लक्ष्य ठेवले होते. तर प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला 20 षटकांत 9 बाद 191 धावाच करता आल्या. या विजयामुळे भारताने 5 सामन्यांच्या या मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे.
डोक्याचे जेवढे केस पिकलेत, तेवढी आंदोलने केलीत – छगन भुजबळ
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियन कर्णधार मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात भारताच्या डावाची सुरूवात अतिशय चांगली झाली. त्यावेळी यशस्वी जैस्वालने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. यशस्वी जैस्वाल 25 चेंडूत 53 धावा करून बाद झाला. त्याने त्याच्या या खेळीत 9 चौकार आणि 2 षटकार लगावले. त्यावेळी भारताची 77 धावसंख्या होती. त्यानंतर ईशान किशन आणि ऋतुराज गायकवाड यांच्यात चांगली भागीदारी झाली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी केली.
त्यावेळी ईशान किशन 32 चेंडूत 52 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 4 षटकार आणि 3 चौकार लगावले. ईशान किशनने या मालिकेतील सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले आहे. त्यानंतर भारताच्या ऋतुराज गायकवाड 58, कर्णधार सूर्यकुमार यादव 19 आणि रिंकू सिंग याने 31 धावांची खेळी केली. विशेष म्हणजे, रिंकू सिंगने या 31 धावा केवळ 9 चेंडूत केल्या आहेत. त्यामुळे भारताला 20 षटकांत 235 धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन एलिसने 3 आणि मार्कस स्टॉइनिसने 1 विकेट घेतली.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज दुसरा टी-20 सामना
त्यानंतर या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरूवात खराब झाली. संघाची 35 धावसंख्या असताना त्यांचा मॅथ्यू शॉर्ट 10 चेंडूत 19 धावा करून बाद झाला. त्यानंतर जोश इंग्लिस 2, ग्लेन मॅक्सवेल 12 तर स्टीव्ह स्मिथ 19 धावा करून बाद झाला. त्यावेळी ऑस्ट्रेलिया संघ अडचणीत आला असताना मार्कस स्टॉइनिस आणि टीम डेव्हिड या दोघांनी शानदार भागीदारी करीत या सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. मात्र त्याचवेळी टीम डेव्हिड 37 धावा करून बाद झाला. मग स्टॉइनिस देखील 45 धावा करून बाद झाला.
त्यामुळे भारताने या सामन्यावरील पकड आणखी मजबूत केली. त्यानंतर कर्णधार मॅथ्यू वेडने 23 चेंडूत नाबाद 42 धावा केल्या, परंतु त्याला आपल्या संघाला विजय मिळवून देता आला नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाला 20 षटकांत 9 बाद 191 धावांवरच समाधान मानावे लागले. या सामन्यात भारताकडून प्रसीध कृष्णा आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या, तर अर्शदीप सिंग, अक्षर पटेल आणि मुकेश कुमार यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली. दरम्यान या सामन्यातील प्लेअर ऑफ मॅचचा पुरस्कार यशस्वी जैस्वालला देण्यात आला.
One Comment on “दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा विजय”