नवी दिल्ली, 20 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) राष्ट्रवादी पक्ष कोणाचा? यासंदर्भात आज निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. या वर्षी जुलैमध्ये अजित पवार यांनी शरद पवार यांना सोडून जात शिंदे सरकारमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी अजित पवारांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. यासोबतच अजित पवारांसोबत गेलेल्या काही नेत्यांना शिंदे सरकारमध्ये मंत्रिपदे मिळाली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भात शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील संघर्ष निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला होता. तर आजच्या सुनावणीत निवडणूक आयोग दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेणार आहे. या सुनावणीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे ह्याही उपस्थित राहणार असल्याचे म्हटले जात आहे.
तत्पूर्वी अजित पवार यांनी जुलैमध्ये शरद पवार यांना सोडून गेल्यानंतर राष्ट्रवादीचे निवडणूक चिन्ह आणि पक्षाच्या नावावर दावा केला होता. या संदर्भात त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. तर अजित पवारांचा हा दावा फेटाळण्यात यावा, अशी मागणी शरद पवार यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. याबाबत त्यांनी निवडणूक आयोगासमोर तक्रार केली होती. याप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोग आज दोन्ही गटांच्या युक्तिवादावर सुनावणी घेणार आहे. तर याप्रकरणी गेल्या आठवड्यात (2 नोव्हेंबर) सुनावणी झाली होती. त्यावेळी निवडणूक आयोगाने सुनावणी पुढे ढकलली होती.
दरम्यान, राष्ट्रवादी पक्षाच्या फुटीनंतर निवडणूक आयोगाने शरद पवार गट आणि अजित पवार गटाला कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानूसार दोन्ही गटांनी आपापल्या समर्थनार्थ अनेक कागदपत्रे निवडणूक आयोगासमोर सादर केली होती. तर या प्रकरणातील सुनावणीवेळी अजित पवार गटाने सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्याचे शरद पवार गटाने म्हटले होते. अजित पवार गटाने सादर केलेल्या कागदपत्रात मृत्यू झालेल्या व्यक्तींचे प्रतिज्ञापत्र आहे. तसेच या सादर कागदपत्रातील बरेचजण 18 वर्षांखालील असल्याचा आरोप शरद पवार गटाने केला आहे.
तर दुसरीकडे अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी आजच्या सुनावणीत निवडणूक आयोगासमोर काही तांत्रिक बाबी ठेवणार असल्याचे म्हटले आहे. तसेच अजित पवार गटाने निवडणूक आयोगाकडे याप्रकरणी नियमित सुनावणी घेण्याची मागणी केली होती. याप्रकरणी आता नियमित सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवी दिल्लीत होणारी सुनावणी आजची अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
One Comment on “राष्ट्रवादी कोणाची? आज निवडणूक आयोगासमोर सुनावणी”